कधी आहे गुरुपौर्णिमा? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पुजा विधी आणि महत्व

गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येते. ती गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र बंधन आणि भक्तीचे प्रतीक आहे. २०२५ मध्ये ती कधी साजरी केली जाते ते जाणून घेऊया.

भारतीय संस्कृतीत ‘गुरु’ हे स्थान अत्यंत पूजनीय मानले जाते. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला विशेष असे स्वतःचे महत्त्व असते. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. या वर्षी गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाईल ते जाणून घेऊया…

गुरुपौर्णिमा कधी आहे?

पंचांगानुसार, आषाढ पौर्णिमेची सुरुवात गुरुवार, 10 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी  सुरू होईल.  आणि या पौर्णिमेची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 11 जुलै रोजी पहाटे 1 वाजून 53 मिनिटांनी संपेल. उद्यतिथीनुसार, यंदा गुरु पौर्णिमा गुरुवार, 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.

गुरु पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त

  • ब्रह्म मुहूर्त – सकाळी 4:10 ते पहाटे 4:50 पर्यंत
  • अभिजित मुहूर्त – सकाळी 11:59 ते दुपारी 12:54 पर्यंत
  • विजय मुहूर्त – दुपारी 12:45 ते दुपारी 3:40 पर्यंत
  • गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 7:21 ते संध्याकाळी 7:41 पर्यंत

गुरु पौर्णिमा पूजाविधी 

  • गुरुपौर्णिमेच्या दिवसाची सुरुवात गुरुदेवांच्या (शिक्षक, मार्गदर्शक) स्मरण आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून करावी. 
  • सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून, आपल्या गुरुंची पूजा करावी. 
  • गुरुंच्या प्रतिमेचे किंवा चित्राचे पूजन करावे. त्यांना हार, फुले अर्पण करावी, तसेच नैवेद्य दाखवावा. 
  • गुरुचरित्र किंवा इतर गुरु-संबंधित मंत्रांचे पठण करावे. 
  • गुरुदक्षिणा किंवा गरजू लोकांना दान करावे. 

गुरु पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व

गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते, हा एक महत्वाचा दिवस आहे, जो आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी, शिष्य त्यांच्या गुरुजनांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा आपल्याला गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि जीवनात गुरुचे स्थान काय आहे, याची आठवण करून देते. गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव आहे. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाकडे घेऊन जातात, योग्य मार्ग दाखवतात. गुरुंच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने, व्यक्ती आध्यात्मिकरित्या प्रगती करू शकते. या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला, ज्यांना वेदांचे जनक मानले जाते. गुरुंच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात. 

गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत

  • या दिवशी, शिष्य आपल्या गुरूंना फुले, वस्त्र, प्रसाद इत्यादी अर्पण करून त्यांची पूजा करतात.
  • या दिवशी गुरुंकडून आशीर्वाद घेणे महत्वाचे मानले जाते.
  • गुरु आपल्याला ज्ञान आणि उपदेश देतात, ज्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
  • गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचे आभार मानणे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News