Ms dhoni : आयपीएल २०२५ चा थरार आज पुन्हा एकदा सुरु झाला आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे या लीगच्या १८व्या हंगामाला मध्येच थांबवावे लागले होते. या हंगामात ५ वेळचा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे प्रदर्शन प्रचंड निराशाजनक झाले आहे.
२० मे रोजी चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. ही लढत दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल. त्यानंतर २५ मे रोजी धोनीची सेना गुजरात टायटन्सशी भिडणार आहे.

चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड या हंगामात दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनीवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, माहीच्या नेतृत्वातसुद्धा चेन्नई सुपर किंग्सचे नशीब पालटले नाही.
जसजसा IPL २०२५ चा हंगाम संपत जात आहे, तसतसे चाहत्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे, की धोनी पुढील हंगामात खेळताना दिसणार का? आता एका रिपोर्टनुसार, महेंद्र सिंग धोनी IPL २०२६ मध्येही खेळणार असल्याची शक्यता आहे. कारण धोनीकडून फ्रँचायझी मालकांना अद्याप हे त्याचा शेवटचा हंगाम आहे याचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
ऋतुराज गायकवाड कर्णधारपदी राहणार
धोनीने सांगितले आहे की, काही महिन्यांनंतर तो यावर निर्णय घेईल. मात्र, धोनी पुन्हा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर ही जबाबदारी पुन्हा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली जाऊ शकते. मात्र, गेल्या दोन हंगामात गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचे प्रदर्शन काहीसे निराशाजनक राहिले आहे.
धोनीचे आयपीएल करिअर
महेंद्र सिंह धोनी हा IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या २७६ सामन्यांपैकी २४१ डावांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने आणि १३७.६३ च्या स्ट्राइक रेटने एकूण ५४२३ धावा केल्या आहेत. या कालावधीत धोनीने २४ अर्धशतके झळकावली आहेत. IPL इतिहासात धोनी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत.
IPL २०२५ मध्ये धोनीने आतापर्यंत १२ सामने खेळले असून, या सामन्यांत त्यांनी १४० च्या स्ट्राइक रेटने एकूण १८० धावा केल्या आहेत.