Operation Sindoor, Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानप्रेरित दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ७ सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांची नियुक्ती केली आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर सोपवण्यात आले आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही या शिष्टमंडळात समावेश असून, त्या ओमान आणि केनिया या देशांना भेट देतील.
या दौऱ्याचा उद्देश म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्दाफाश करणे आणि जागतिक समुदायाचे समर्थन मिळवणे हा आहे.
दरम्यान, प्रारंभी काँग्रेसने ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचे शिष्टमंडळासाठी सुचवले नव्हते, परंतु केंद्र सरकारने त्यांचा समावेश केला. या संदर्भात थरूर यांनी प्रतिक्रिया दिली की, “केंद्र सरकारने त्यांना योग्य वाटणाऱ्या व्यक्तींची निवड केली आहे. ”

दरम्यान, सुप्रिया सुळे आणि शशी थरूर यांची आंतरराष्ट्रीय दौऱ्यातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या सहभागामुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल.
शशी थरूर यांचे नाव यादीत नव्हते
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्यासाठी सरकारने खासदारांच्या शिष्टमंडळांची नियुक्ती केली. यामध्ये काँग्रेस पक्षाकडून शशी थरूर यांचे नाव पक्षाच्या अधिकृत यादीतून सुचवण्यात आले नव्हते. यावर काँग्रेसचे खासदार आणि परराष्ट्र व्यवहारातील जाणकार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसला तो पूर्ण अधिकार, पण सरकारने योग्य वाटणाऱ्यांची निवड केली- थरूर
थरूर म्हणाले, “पक्षाला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही सरकारची शिष्टमंडळे असल्यामुळे सरकारने त्यांच्या दृष्टीने योग्य वाटणाऱ्यांची निवड केली. मला यामागील सरकार आणि पक्षामधील कोणत्याही अतिरिक्त संवादाची माहिती नाही. याविषयी संबंधितांकडेच विचारले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, की “माझी निवड ही दोन गोष्टींवर आधारित होती, एक म्हणजे मी संसदीय स्थायी समितीचा अध्यक्ष आहे, जी या मुद्द्यांशी संबंधित आहे. दुसरे म्हणजे माझा आंतरराष्ट्रीय घडामोडीतील दीर्घ अनुभव. सध्या देशाला अशा अनुभवाची आणि माझ्या ज्ञानाची गरज आहे, त्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारली.”
थरूर यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, त्यांनी व्यक्तिगत मनभेद न ठेवता देशहितासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारने त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सूचित केले.
सुप्रिया सुळे या देशांना भेटी देणार
दरम्यान, या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा समावेश असून, त्या ओमान आणि केनिया या देशांना भेट देतील. भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेचा जागतिक प्रचार करण्यासाठी हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत.