Sanjay Raut Book : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या तुरुंगातील अनुभवावर आधारित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी तुरुंगातील आपले अनुभव सांगताना काही राजकीय बॉम्बही फोडले.
मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार, जावेद अख्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, हे पुस्तक प्रकाशनाआधीपासूनच चांगलेच चर्चेत आले आहे. राऊत यांनी पुस्तकामधून अनेक जुने-नवे किस्से सांगितले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. पुस्तकात संजय राऊत यांनी अमित शाह, एकनाथ शिंदें यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांच्याबद्दलची खंत
संजय राऊत यांना आर्थर रोड जेलमध्ये नेत असताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका फोन कॉलवरुन कसे वाचवले होते याबद्दलची आठवण झाल्याचे पुस्तकात लिहिले आहे. अमित शाह यांना बाळासाहेबांनी कसे वाचवले याचा पूर्ण किस्सा राऊत यांनी पुस्तकात सांगितला आहे. तसेच संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलची एक खंतही बोलून दाखवली आहे.
तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असे म्हटले आहे. “माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, ‘संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!’ खरे तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचे नाते कायम राहिले आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटले. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही’.
मध्यस्थीसाठी एकनाथ शिंदे यांचा अमित शाह यांना फोन?
अटकेच्या आदल्या दिवशी मला एकनाथ शिदे यांनी अमित शाह यांच्याशी बोलू का? असा फोन केला होता. त्यावेळी मी म्हणालो, काही गरज नाही. मी म्हटले, वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. काही गरज नाही, उद्या मला अटक होऊ द्या. मी पळून जाणार नाही. वरती बोलण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोपही केला.
अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच शिवसेना आणि भाजपात दरी पडली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच भाजपा आणि शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली. अमित शाह यांना अरुण जेटली यांनीही असे करु नका असे समजावले होते.
प्रकाशन सोहळा गाजला
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संजय राऊतांच्या लेखणीचे कौतुक केले, तर राऊत यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांच्या अनेक योजना उघड केल्या. कार्यक्रमातील या थेट आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे.