Elon Musk to kekius Maximus : टेस्ला आणि स्पेस एक्ससारख्या कंपन्यांचे सीईओ एलन मस्क त्यांच्या चित्र विचित्र वागणुकीसाठी ओळखले जातात. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असले तरी, त्यांचे अनेक निर्णय नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
आता एलन मस्क यांनी आपले नाव बदलले आहे. ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे. सोशल मीडियावर त्यांनी त्यांचे नवे नाव सांगितले आहे. शनिवारी त्यांनी आपल्या प्रोफाइलमधील नाव बदलून “केकियस मॅक्सिमस” ठेवले आहे. यापूर्वी त्यांच्या प्रोफाइल फोटोखाली नाव “गॉर्कलोन रस्ट” असे होते. नाव बदलण्यासोबतच त्यांनी आपला प्रोफाइल फोटोही बदलला आहे.
एलन मस्क यांचा प्रोफाइल फोटो
एक्स’वर आपले नाव बदलण्यासोबतच मस्क यांनी प्रोफाइल फोटोही बदलला आहे. या फोटोमध्ये ते कवच घालून दिसत आहेत, जणू काही एखाद्या लढाईसाठी निघालेले आहेत. फोटोमध्ये त्यांनी स्वतःला “केकियस मॅक्सिमस” सम्राट म्हणून दर्शवले आहे. अशा स्थितीत, अखेर “केकियस मॅक्सिमस” नेमके आहे तरी काय? आणि मस्क हे का प्रमोट करत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

क्रिप्टोकरेंसी आहे केकियस मॅक्सिमस
रिपोर्टनुसार, केकियस मॅक्सिमस ही एक क्रिप्टोकरेंसी आहे. एलन मस्क यांनी या क्रिप्टोकरेंसीचा प्रचार केल्यापासून याच्या किमतीत वाढ झाली आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, हे नाव रोमन सम्राटांप्रमाणे वाटत असेल तरी ‘केक’ हा शब्द इंटरनेटवर ‘lol’ म्हणजे जोरात हसण्याच्या संदर्भात वापरला जातो. ‘मॅक्सिमस’ हा लॅटिन शब्द असून याचा अर्थ ‘सर्वात मोठा’ असा होतो.
रिपोर्टनुसार, मस्क यांनी हे नाव स्वीकारल्यापासून या क्रिप्टोकरेंसीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील २४ तासांत याच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये ७२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याआधी मस्क यांनी आपले नाव ‘गोर्कलोन रस्ट’ असे ठेवले होते, जे एका मीम कॉइनचे प्रतीक आहे.
एलन मस्क चर्चेत सतत राहतात
अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्पचे खुले समर्थन केले होते. ट्रम्प सत्तेत आल्यावर मस्क यांना अमेरिकन सरकारमध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ट्रम्प भारतातही आपला व्यवसाय वाढवण्याचा मनसूबा बाळगत आहेत. ते त्यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवेला लवकरच देशात सुरू करण्यासाठी सरकारशी संपर्कात आहेत. विशेष म्हणजे मस्क यांच्या कंपनीला त्यासाठी प्राथमिक मंजुरी देखील मिळाली आहे. स्टारलिंकने एयरटेल आणि जिओसारख्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे देशभरात स्टारलिंकचे उपकरणे उपलब्ध होऊ शकतील.