दिग्गज लुका मॉड्रिचची सचिनसारखीच विदाई, स्टेडियममध्ये बसलेले हजारो प्रेक्षक लहान मुलांसारखे रडू लागले

३९ वर्षीय लुका मॉड्रिच याची गणना जगातील सर्वोत्तम मिडफिल्डर्समध्ये केली जाते. तो क्रोएशियाचा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, क्रोएशियाने २०१८ च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होतातह

अनुभवी मिडफिल्डर लुका मॉड्रिच याने १३ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीनंतर रिअल माद्रिद संघाला निरोप दिला आहे. तो पुन्हा कधीही माद्रिदच्या आयकॉनिक पांढऱ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार नाही. २०२४-२०२५ ला लीगा मधील रिअल माद्रिदच्या शेवटच्या सामन्यादरम्यान त्याला भव्य निरोप देण्यात आला.

८५ व्या मिनिटाला त्याला कार्लो अँसेलोटी याने बदली केले. जेव्हा मॉड्रिच मैदानाबाहेर जात होता, तेव्हा तो खूप भावनिक झाला होता. सॅंटियागो बर्नाबेऊ येथे उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक आणि खेळाडू उभे राहिले आणि टाळ्या वाजवून त्याला निरोप दिला.

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लुका मॉड्रिच जेव्हा मैदानातून बाहेर जात होता, तेव्हा स्टँडमध्ये बसलेली एक महिला फॅन त्याला मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले.

अशाच प्रकारचे दृश्य २०१३ मध्ये पाहायला मिळाले होते, जेव्हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर निवृत्त झाला होता. त्या दिवशीही संपूर्ण मैदानात भावनिक वातावरण होते.

लुका मॉड्रिच याच्या अखेरच्या ला लीगा सामन्यात रिअल माद्रिडने रिअल सोसिडेडचा २-० ने पराभव केला. या सामन्यात दोन्ही गोल किलियन एम्बाप्पे याने केले.

सामन्यानंतर लुका मॉड्रिच काय म्हणाला?

लुका मॉड्रिच यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “मी पूर्ण मनाने जात आहे. अभिमान, कृतज्ञता आणि अशा आठवणींनी भरलेलो आहे ज्या कधीच विसरता येणार नाहीत. क्लब वर्ल्ड कपनंतर मी पुन्हा कधीही ही जर्सी मैदानावर परिधान करणार नाही. मी नेहमी रिअल माद्रिदचा चाहता राहीन.”

लुका मॉड्रिचची रिअल माद्रिदसाठी विक्रमी कामगिरी

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, लुका मॉड्रिच याने रिअल माद्रिदसोबत आपल्या कारकिर्दीत एकूण २८ ट्रॉफीज जिंकल्या आहेत. त्यामध्ये ६ चॅम्पियन्स लीग, ६ क्लब वर्ल्ड कप, ५ युरोपियन सुपर कप, ५ स्पॅनिश सुपर कप, ४ ला लीगा आणि २ कोपा डेल रे विजेतेपदांचा समावेश आहे.

त्याने रिअल माद्रिदसाठी एकूण ५९० सामने खेळले असून ४३ गोल केले आहेत. २०१८ मध्ये त्याने रिअल माद्रिदसाठी खेळताना प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर (Ballon d’Or) पुरस्कार जिंकला होता. त्याच वर्षी त्याने फीफा बेस्ट मेन प्लेयर आणि UEFA मेन प्लेयर चे पुरस्कारही पटकावले.

याशिवाय मॉड्रिच ६ वेळा FIFPro वर्ल्ड इलेव्हन चा भाग राहिले आहेत आणि २ वेळा UEFA चॅम्पियन्स लीग बेस्ट मिडफिल्डर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

लुका मॉड्रिक कोण आहे?

३९ वर्षीय लुका मॉड्रिच याची गणना जगातील सर्वोत्तम मिडफिल्डर्समध्ये केली जाते. तो क्रोएशियाचा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, क्रोएशियाने २०१८ च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, जिथे त्यांना फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला. रिअल माद्रिदपूर्वी, मॉड्रिच टोटेनहॅम आणि दिनामो झाग्रेबकडूनही खेळला आहे. आता, क्रोएशियन फुटबॉलपटू कोणत्या क्लबकडून खेळतो हे पाहणे मनोरंजक असेल. लुकाचा गेल्या हंगामात रिअल माद्रिदमध्ये चांगला खेळ झाला नाही. क्लबला एकही मोठी ट्रॉफी जिंकता आली नाही.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News