Liberian Cargo Ship Sink : रविवारी सकाळी ७:५० वाजता कोची किनाऱ्याजवळ लायबेरियन कंटेनर जहाज एमएससी एल्सा ३ (आयएमओ क्रमांक ९१२३२२१) बुडाल्यानंतर तणाव वाढला आहे. जहाज बुडाल्यानंतर भारतीय तटरक्षक दल (ICG) हाय अलर्टवर आहे. लायबेरियातील कंटेनर जहाज एमएससी एल्सा ३ शुक्रवारी विशाखापट्टणम बंदरातून कोचीसाठी निघाले होते. २४ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत बचाव कार्यासाठी जहाजावर फक्त तीन क्रू मेंबर्स होते. यात कॅप्टन, चीफ इंजिनिअर आणि सेकंड इंजिनिअर उपस्थित होते. पण, २५ मे रोजी सकाळी जहाज उलटले आणि बुडाले.
देवदुतासारखे पोहोचले इंडियन कोस्टगार्ड
२४ मे रोजी दुपारी १:२५ वाजता MSC एल्सा ३ या जहाजावर तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाली. हे जहाज कोचीनपासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर होते. जहाज २६ अंश उजव्या बाजूला झुकले होते आणि बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. शिपिंग कंपनीला चालक दलाशी संपर्क साधता आला नाही, त्यामुळे त्यांनी भारतीय तटरक्षक दलाकडे (ICG) मदतीची विनंती केली.

कोचीन येथील समुद्री बचाव उपकेंद्राने तत्काळ एक डॉर्निअर विमान पाठवले, ज्याने हवाई पाहणी करून जहाजाचा शोध घेतला. विमानाने दोन लाइफराफ्टची ओळख पटवली, ज्यामध्ये अनुक्रमे ५ आणि ४ असे एकूण ९ जण जिवंत होते. बचावासाठी हवेमधून अतिरिक्त लाइफराफ्ट टाकण्यात आले. त्यानंतर तटरक्षक दलाच्या ‘अर्नवेश’ जहाजाने आणखी १२ जणांना वाचवले, तर ‘एमव्ही हान यी’ ने आणखी ९ जणांना सुरक्षित बाहेर काढले. ‘आयएनएस सुजाता’ देखील या बचाव मोहिमेचा भाग होता.
लायबेरियन जहाज बुडाल्यामुळे का वाढली चिंता?
लायबेरियन जहाजावर ६४० कंटेनर होते, त्यापैकी १३ कंटेनरमध्ये धोकादायक सामग्री आणि १२ कंटेनरमध्ये कॅल्शियम कार्बाइड होते. याशिवाय, जहाजात ८४.४४ मेट्रिक टन डिझेल आणि ३६७.१ मेट्रिक टन फर्नेस तेल होते. जहाज बुडाल्यानंतर खरी चिंता ही गळती आणि प्रदूषणाबाबत आहे. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) आपल्या ‘सक्षम’ या प्रदूषण नियंत्रण जहाजाची नेमणूक केली असून गळतीचा शोध घेण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज विमाने वापरली जात आहेत. सध्या तरी कोणतीही गळती झाल्याची माहिती मिळालेली नाही. केरळचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनासाठी महत्त्वाचा किनारपट्टी भाग लक्षात घेता ICG पर्यावरणीय परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
चालक दलातील सर्व २४ सदस्य वाचवले गेले
लायबेरियन जहाजावरील सर्व २४ चालक दलातील सदस्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. यापैकी २१ जणांना भारतीय तटरक्षक दलाने (ICG) आणि ३ जणांना भारतीय नौदलाच्या आयएनएस सुजाता या जहाजाने वाचवले. चालक दलामध्ये एक रशियन (कप्तान), दोन युक्रेनियन, एक जॉर्जियन आणि २० फिलीपिन्सचे नागरिक होते.