श्रीनगर- पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी दहशतवाद्यांनी घेतला. त्याचा परिणाम महिनाभरानंतरही जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर जाणवतो आहे. 2024 साली पर्यटन मौसम बहरलेला होता, यावर्षी मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. मे आणि जून या काळात पर्यटकांनी फुलणारं काश्मीर सध्या एकदम शांत शांत आहे. पहलगामच्या दऱ्याखोऱ्यांपासून श्रीनगरच्या दल लेकपर्यंत सगळीकडे शुकशुकाट जाणवतोय. वानगी दाखलही पर्यटक फिरताना दिसत नाहीयेत.
सुरक्षेच्या कारणांमुळे अजूनही काश्मिरातील काही पर्यटनस्थळं बंद आहेत. हेही पर्यटक न येण्याचं एक कारण मानण्यात येतंय. पहलगामपासून बैसरन खोऱ्यापर्यंत आसपासची पर्यटन स्थळं सध्या बंद आहेत.

पर्यटनाला मोठा फटका
2024 सालात जम्मू-काश्मीरमध्ये 2.35 कोटी पर्यटक आले होते. 2023 च्या 2.11 कोटी पर्यटकांपेक्षा हा आकडा चांगलाच मोठा होता. यामुळं साहसी पर्यटन, गोल्फ पर्यटन, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा विचार होता. मात्र पहलगाम हल्ल्यानं या सगळ्या स्वप्नांवर विरजण पडल्याचं दिसतंय.
दल लेक परिसरात शुकशुकाट
दल लेक हा श्रीनगरमधील सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र आज त्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. परिसरात असलेले हॉटेल्स, शिकारे, हाऊसबोट या सगळ्यांवर याचा परिणाम झालेला दिसतोय. या परिसरात सुमारे 940 हाऊसबोट असल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्यांना पर्.टक न आल्याचा फटका बसलाय. कर्ज उभारुन हाऊस बोट निर्मिती करणाऱ्यांसमोर तर आता हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झालाय.
पर्यटकांनी येणं हाच दहशतवाद्यांना धडा
पहलगाम हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी त्यांचं ध्येय गाठलं. पर्यटकांनी काश्मिरात येऊ नये, हीच दहशतवाद्यांची इच्छा होती. हल्ल्यानंतर नेमकं तेच आता होताना दिसतंय. काश्मीरच्या जनतेसोबतही या निमित्तानं दहशतवाद्यांनी युद्ध सुरु केल्याची भावना आहे. या सगळ्यावर उत्तर म्हणून भारतातील पर्यचकांनी मोठ्या संख्येनं काश्मिरात यावं असं आवाहन काश्मिरातील स्थानिक करतायेत. जितक्या जास्त संख्येनं पर्यटक येतील, ती संख्याच दहशतवाद्यांच्या कानफटात असेल, अशी स्थानिकांची भावना आहे. सरकारनं बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळं सुरु करावीत, अशीही मागणी करण्यात येतेय.