Explainer: भारतात कोरोनाचे एकूण किती रुग्ण? कोणतं राज्य सर्वाधिक बाधित? सरकारची तयारी अन् सर्वकाही जाणून घ्या

COVID-19 Latest Update: यावेळी कोरोना अधिक धोकादायक ठरणार आहे का? सतत वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहेत का?

गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ चे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. सुदैवाने सध्या सक्रिय रुग्णसंख्या कमी आहे. मात्र नवं व्हेरिएंट आणि काही राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वजण अलर्ट झाले आहेत. सरकार आणि आरोग्य विभागाकडून आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे. अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यंदाचा कोरोना गेल्यावेळीपेक्षा अधिक घातक असेल का? कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या? सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी? याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.

भारतात कोरोनाची काय आहे स्थिती?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २५ मे २०२५ पर्यंत भारतात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २५७ पर्यंत पोहोचली आहे. हा आकडा कमी असला तरी काही राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या?

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, १२ मे ते १९ मेदरम्यान अनेक राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचं दिसतंय. केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. येथे ९५ नवे सक्रिय रुग्ण आहेत. तमिळनाडूत ६६ रुग्णसंख्या असून हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात ५६ रुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

केरल- 96
तमिलनाडु-66
महाराष्ट्र-56
दिल्ली-5
गुजरात-7
हरियाणा-1
कर्नाटक-13
पुडुचेरी-10
राजस्थान-2
सिक्किम-1
पश्चिम बंगाल-1

नवे व्हेरिएंट्स NB.1.8.1 आणि LF.7

भारतात कोविड-१९ चे दोन नवीन प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये NB.1.8.1 आणि LF.7. यांचा समावेश आहे. तामिळनाडूमध्ये NB.1.8.1 चा एक आणि गुजरातमध्ये LF.7 चे चार रुग्ण आढळून आले आहेत. चीन, हाँगकाँग आणि इतर आशियाई देशांमध्ये रुग्णसंख्या वाढीमागे हे नवे प्रकार जबाबदार असल्याचे मानले जाते.

खरंच, भीतीदायक परिस्थिती आहे का?

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या येणारी नवी प्रकरणं गंभीर नाहीत. त्या रुग्णांवर घरीच उपचार केला जाऊ शकतो. मात्र ज्यांना आधीच काही आजार असतील त्यांच्याबाबतील उपचारादरम्यान गुंतागुंत होऊ शकते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्यामध्ये मधुमेहाने ग्रासलेल्या २१ वर्षीय तरुणाचा कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला.

काय काळजी घ्याल?

गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे
नियमितपणे हात धुणे
लसीकरण आणि बूस्टर डोस
आजारी वाटल्यास घरी राहणे
गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर राखणे

कोणाला सर्वाधिक धोका?

ज्येष्ठ नागरिक, मधुमेही, हृदयविकारासंबंधित आजार असणारे, अस्थमा किंवा जुना आजाराने ग्रासलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशांनी अधिक काळजी घ्यायला हवी. सुदैवाने अद्यापह भारतातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र नवे व्हेरियंट आणि काही राज्यांमध्ये वाढती संख्या चिंतेचा विषय आहे.

 

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News