Anil Kumble On Karun Niar : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे, की भारतीय क्रिकेट संघात विराटच्या जागी नंबर ४ वर कोण खेळणार? कारण कोणत्याही संघात या फलंदाजी क्रमाला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते.
विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या महान फलंदाजांनी या स्थानावर दीर्घकाळ संघासाठी कठीण परिस्थितीत शानदार खेळ केला आहे. अशातच टीम इंडियाचा माजी कोच आणि दिग्गज क्रिकेट अनिल कुंबळे याने या क्रमांकासाठी एका फलंदाजाचे नाव सुवचवले आहे. इंग्लंड दौऱ्याबाबत बोलताना अनिल कुंबळे याने करुण नायर याला या स्थानावर संधी देण्याची शिफारस केली आहे.

अनिल कुंबळेनं सुचवलं करुण नायरचं नाव
कुंबळे म्हणाला, ‘ज्या प्रकारे करुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत, त्यामुळे त्याला भारतीय संघात हा क्रमांक मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. कदाचित तो भारतासाठी नंबर ४ फलंदाज होऊ शकतो. कारण मला वाटते की थोडा अनुभव असणे गरजेचे आहे. तुम्हाला इंग्लंडमध्ये अशा खेळाडूची गरज आहे, जो तिथे याआधी खेळलेला आहे आणि तिथल्या परिस्थितीची जाण ठेवतो.’
दरम्यान, करुण नायर कदाचित तेंडुलकर आणि कोहली यांच्या टेस्ट आकड्यांच्या जवळपास पोहोचू शकणार नाही, कारण ३३ वर्षांच्या वयात त्यांच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही. पण मागील देशांतर्गत हंगामात त्याने ज्या प्रकारचा फॉर्म दाखवला आहे, त्यावरून तो पुढील दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) सायकलसाठी चांगले काम करू शकतो, असेही कुंबळे म्हणाला.
करुण नायर शानदार फॉर्मात
करुण नायर याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ९ सामन्यांमध्ये ७७९ धावा फटकावल्या आहेत, ज्यात ५ शतकांचा समावेश होता. त्याने हीच लय रेड-बॉल क्रिकेटमध्येही कायम ठेवली, जिथे त्याने ५७.३३ च्या सरासरीने ८६० धावा केल्या, ज्यामध्ये ४ शतके होती. करुण नायरच्या या कामगिरीच्या बळावर विदर्भाने रणजी ट्रॉफी जिंकली, त्याने या स्पर्धेच्या फायनलमध्ये १३५ आणि ८५ धावांची खेळी साकारली होती.