टीम इंडियाची क्रिकेटपटू दीप्ती शर्माला २५ लाखांना गंडवले, जवळच्या मैत्रिणीनेच दिला धोका

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दीप्ती शर्मा हिला तिच्याच मैत्रिणीने फसवले आहे. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

Indian Women Cricketer Deepti Sharma : भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू आणि उत्तर प्रदेशची डीएसपी दीप्ती शर्मा हिच्या घरी चोरी झाली आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, दीप्तीची मैत्रीण आरुषी गोयल हिच्यावर या चोरीचा आरोप आहे. दीप्तीचा भाऊ सुमित शर्मा याने ही माहिती पोलिसांना दिली आहे.

क्रिकेटपटू दीप्ती शर्माची मैत्रीण तिच्यासोबत ज्युनियर संघात खेळली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती डीसीपी सोनम कुमार यांनी दिली आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

दीप्ती शर्माची मैत्रीण आरुषी गोयल दिल्लीची रहिवासी आहे आणि ती आग्रा कँट रेल्वे स्टेशनवर कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. आरुषीने दीप्तीशी असलेल्या मैत्रीचा फायदा घेत थोडे-थोडे करून २५ लाख रुपये उधार घेतले. मात्र जेव्हा हे पैसे परत देण्याची वेळ आली, तेव्हा आरुषी गोयलने दीप्ती शर्मा यांना फसवले आणि पैसे परत देण्यास नकार दिला.

 

काय-काय चोरीला गेले?

यानंतर दीप्तीने आरुषीला तिच्या फ्लॅटवर येण्यास मनाई केली. परंतु जेव्हा दीप्ती क्रिकेटसाठी परदेशात गेली होती, तेव्हा आरुषीने फ्लॅटमधून काही सामान घेण्याची विनंती केली. यानंतर दीप्तीचा भाऊ सुमित जेव्हा फ्लॅटवर पोहोचला, तेव्हा त्याच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला नाही. यानंतर आरुषीला याबाबत विचारले असता, तिनेच फ्लॅटचे लॉक बदलल्याचे सांगितले. नंतर सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले, की आरुषी यापूर्वीही दीप्तीची परवानगी न घेता तिच्या फ्लॅटवर आली होती.

आता आरुषीवर दीप्तीच्या फ्लॅटमधून अडीच हजार डॉलर्स, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News