वॉशिंग्टन डीसी – अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. इस्रायली दुतावास नोकरी करत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी एका माथेफिरू व्यक्तीनं गोळ्या मारुन हत्या केलीय. बुधवारी रात्री ही घटना घडली. शिकागोस्थित आरोपीनं फ्री पॅलेस्टाईन अशी घोषणाबाजी करत या दोन्ही कर्मचाऱ्यांना जवळून गोळ्या मारल्या. वॉशिंग्टन डीसीतील ज्यू म्युझियमच्या बाहेर हा प्रकार घडलाय.
हल्ल्यात ठार झालेले स्त्री आणि पुरुष दोघेही दुतावासात नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि काही दिवसांतच ते विवाहबंधनात अडकणार होते.

कुणी केला हल्ला ?
अमेरिकेच्या पोलिसांनी घटनेनंतर तातडीनं माथेफिरू तरुणाला अटक केली आहे. एलियास रॉड्रीगेज असं या तरुणाचं नाव असू तो शिकागोचा रहिवासी आहे. त्याचं वय ३० वर्षांचं असून त्यानं पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देत गोळीबार केला आणि अटकेवेळीही तो याच घोषणा देत होता.
हे टार्गेट किलिंग-अमेरिका
अमेरिकेच्या पोलिसांनी सांगितलं की हा संशयित म्युझियमच्या बाहेर घुटमळत होता. म्युझियममधून बाहेर पडणाऱ्या चौघांवर त्यानं गोळीबार केला. त्यात एक महिलेचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झालाय. या प्रकरणाचा तपास आता एफबीआयच्या वतीनं करण्यात येतोय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत या घटनेचा निषेध नोंदवलाय. ही ज्यू विरोधातून झालेली घटना आहे. हे संपण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. अमेरिकेत द्वेष आणि धर्मांधतेला स्थान नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
हा ज्यूंवर हल्ला- इस्रायली राजदूत
संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅन यांनी या घटनेचा निषेध नोंदवत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा ज्यूविरोधी दहशतवाद असल्याचं सांगत, हा संपूर्ण ज्यू समाजावर झालेला हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेनं या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय.