Yogesh Kadam On Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या मुंबई भेटीबाबत महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी मोठे विधान केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योती जिथे जिथे गेली तिथून माहिती गोळा केली जात आहे.
कदम म्हणाले, की “ही अत्यंत संवेदनशील बाब आहे, त्यामुळे सध्या अधिक माहिती शेअर करता येणार नाही.” आमच्या एजन्सी पूर्णपणे सतर्क आहेत आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे.

मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणाची माहिती घेत आहेत- योगेश कदम
गरज पडल्यास ज्योती मल्होत्राची कोठडी मागितली जाईल, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही स्पष्ट केले. ते म्हणाले, “सध्या या प्रकरणात केंद्रीय तपास संस्था मुख्य भूमिका बजावत आहेत आणि महाराष्ट्र पोलिस त्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण प्रकरणाची सतत अपडेट घेत आहेत.”
ज्योती ४ वेळा मुंबईत आली होती
तपास यंत्रणांना असे आढळून आले आहे, की २०२३ ते २०२४ या काळात युट्यूबर ज्योती मल्होत्रा ४ वेळा मुंबईत आली होती. प्रत्येक वेळी तिने शहरातील वेगवेगळ्या भागात व्हिडिओ आणि फोटो काढले.
सूत्रांच्या माहितीनुसार-
- जुलै २०२४ मध्ये लक्झरी बसने मुंबईला पोहोचली.
- ऑगस्ट २०२४ मध्ये अहमदाबादहून कर्णावती एक्सप्रेसने आली.
- सप्टेंबर २०२४ मध्ये नवी दिल्लीहून पंजाब मेलने प्रवास केला.
- २०२३ मध्ये गणपती उत्सवादरम्यान ‘लालबाग चा राजा’ आणि संपूर्ण परिसराच्या गर्दीचा व्हिडिओ बनवला.
तपासात असेही आढळून आले, की ज्योतीने तिच्या डिव्हाइसमधून अनेक संवेदनशील व्हिडिओ आणि फोटो डिलीट केले होते, जे एजन्सींनी विशेष रिकव्हरी तंत्रांद्वारे मिळवले आहेत. आता हे व्हिडिओ आणि फोटो कोणाला पाठवले गेले आणि त्यात कोणती संवेदनशील माहिती होती याचा तपास केला जात आहे.
मुंबईच्या सुरक्षेबद्दल गृहराज्य मंत्री काय म्हणाले?
महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री म्हणाले, की “मुंबई पोलिस सणांच्या काळात अधिक सतर्क राहतात. गणपती उत्सव असो, दिवाळी असो किंवा नवरात्र असो, प्रत्येक प्रसंगी पोलिसांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे. हे लक्षात घेऊन, राज्य सरकारने अलीकडेच गुप्तचर विभागात आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे, जेणेकरून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल’.