सलमान खान किती सुरक्षित? सलमानच्या घरात दोन दिवसांत दोन व्यक्ती घुसल्या, काय आहे प्रकरण?

अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गँगस्टरच्या हिट लिस्टवर असलेल्या सलमानच्या घरात गेल्या दोन दिवसांत दोघांनी शिरण्याचा प्रयत्न केला. यावरुन सलमानच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

मुंबई– काळवीट प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टार्गेटवर असलेला अभिनेता सलमान खान याच्या घरातील सुरक्षा किती तकलादू आहे याचा अनुभव देणारी घटना समोर आली आहे. सलमान खानला सातत्यानं येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि त्याच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबत सलमानचे खासगी सुरक्षारक्षकही तैनात असतातच. या सगळ्यात गेल्या दोन दिवसांत दोन व्यक्तींनी सलमानच्या घरात प्रवेश केल्याचं समोर आलंय.

पहिली घटना ही २० मेची आहे. छत्तीसगड़मध्ये राहणारा तरुण सलमानच्या घरात शिरला होता. आरोपीचं नाव जितेंद्रकुमार असं असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तर बुधवारी रात्री इशा छाबडा नावाच्या तरुयणीनंही सलमानच्या घरात प्रवेश केल्याची घटना समोर आलीय. ही तरुणी सलमानच्या घरात प्रवेश करत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. तिलाही पोलिसांनी अटक केली असून, या दोन्ही प्रकरणांचा तपास गांभिर्यानं करण्यात येतोय.

तरुणाला हाकललं तरी तो पुन्हा परतला

सलमानच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी संदीप नारायण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे. २० मे च्या सकाळी नऊच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती गॅलक्सी अपार्टमेंटच्या परिसरात फिरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी या तरुणाला हटकलं आणि त्या परिसरातून जाण्यास सांगितलं. यानंतर चिडलेल्या तरुणानं त्याचा मोबाईल जमिनीवर आपटून तोडून टाकला.

हाच तरुण संध्याकाळी सव्वा सातच्या सुमाराला गॅलक्सीच्या मुख्य दरवाजाजवळ आला आणि बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या कारमधून त्याने आत प्रवेश मिळवला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं या तरुणाला अटक केली आणि वांद्रे पोलिसांच्या ताब्यात तरुणाला देण्यात आलं.

या दोन्ही घटनांनी सलमानच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झालं आहे.

सलमानला वाय प्लस सुरक्षा, २४ तास ११ पोलीस

लॉरेन्स गँगकडून मिळालेल्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. वाय प्लस दर्जाची सुरक्षा त्याला देण्यात आली आहे. यात ११ जवान त्याच्यासोबत २४ तास असतात. यातले एक ते दोन जणं हे कमांडो असतात.

सलमानच्या गाडीला एस्कॉर्ट करण्यासाठी दोन पोलिसांच्या गाड्याही त्याच्यासोबत नेहमी असतात. सलमानची गाडीही बुलेटप्रुफ आहे.

गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबारानंतर सलमान राहत असलेल्या घराची बाल्कनीही बुलेटप्रूफ करण्यात आलेली आहे. हाय रेस्युलेशेनचे कॅमेरे या परिसरावर सतत लक्ष ठेवून असतात.


About Author

Smita Gangurde

Other Latest News