लॉर्ड्स टेस्टमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या चौथ्या दिवशी एक वादग्रस्त प्रसंग घडला, ज्यामुळे हा दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. ही घटना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट यांच्यातील आहे. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सिराजने डकेटला जसप्रीत बुमराहच्या हातून झेलबाद केलं. विकेट मिळाल्यानंतर सिराज आनंदाने उत्सव साजरा करत असताना त्यांचा खांदा डकेटच्या खांद्याला हलकेच लागला.
नेमकी घटना काय घडली?
ही घटना इंग्लंडच्या डावातील सहाव्या षटकात घडली. षटकातील पाचव्या चेंडूवर बुमराहने डकेटचा झेल घेतला. त्यानंतर उत्साहात असलेले सिराज विजयाचा आनंद साजरा करत होता. त्याचवेळी, डकेटही सिराजच्या दिशेने वळला आणि दोघांचे खांदे एकमेकांना लागले. टीव्ही रिप्लेमध्ये हे स्पष्ट दिसून आले की डकेटने स्वतःच सिराजच्या दिशेने हालचाल केली होती, त्यामुळेच संपर्क झाला.

DSP SIRAJ FIRED UP
🫨#INDvsENG pic.twitter.com/DE0A7eUvqc— Puneet (@Puneet201764291) June 24, 2025
कोणावर होऊ शकते कारवाई?
आयसीसीच्या आचारसंहितेतील आर्टिकल 2.12 नुसार, खेळाडूंनी खेळादरम्यान जानबूजून शारीरिक संपर्क करू नये. जर सिराज किंवा डकेट यापैकी कोणालाही दोषी ठरवले गेले, तर त्यांच्यावर लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 चा दोष ठेवला जाऊ शकतो. खास करून जेव्हा एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूला जानबूजून धक्का देतो, तेव्हा त्याला शिक्षा होते.
तिसऱ्या दिवशीही झाला होता वाद
या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस देखील मोहम्मद सिराज आक्रमक मूडमध्ये दिसला होता. स्टंप्सपूर्वी इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉली सामना उशीर करत असल्याचं जाणवलं, त्यामुळे सिराज आणि क्रॉलीमध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली. या वादात शुभमन गिल देखील सहभागी झाला होता. या वादग्रस्त प्रसंगामुळे आता आयसीसीकडून कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.