आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या क्षेत्रात सध्या एक नव्या टॅलेंट वॉरची सुरुवात झाली आहे. या युद्धात आता वरुण मोहन हे नाव केंद्रस्थानी आले आहे. जे Windsurf चे सह-संस्थापक आणि माजी CEO आहेत. अलीकडेच Google ने Windsurf मधून वरुण मोहन, त्यांचे सह-संस्थापक डगलस चेन आणि कंपनीतील सीनियर R&D स्टाफला आपल्या DeepMind टीममध्ये सामावून घेतले आहे.
तरीही Windsurf कंपनी बंद पडलेली नाही. नवीन अंतरिम CEO जेफ वांग यांनी स्पष्ट केलं आहे की, कंपनीची मुख्य टीम अद्याप सक्रिय आहे आणि ती आपली एंटरप्राइज़ टूल्स विकसित करत राहील.

OpenAI जवळ पोहचलेली डील, पण Google ने मारली बाजी
Windsurf ही एक वेगाने वाढणारी AI स्टार्टअप कंपनी आहे, जी विशेषतः कोड जनरेशनवर लक्ष केंद्रित करते. काही अहवालांनुसार, OpenAI ही कंपनी Windsurf ला जवळपास 3 अब्ज डॉलर्स मध्ये खरेदी करणार होती. मात्र, डील पूर्ण होण्याआधीच Google ने एक मोठं आणि धक्कादायक पाऊल उचललं.
Google ने Windsurf च्या काही तंत्रज्ञानासाठी $2.4 अब्ज डॉलर्सचा नॉन-एक्सक्लूसिव लायसन्स घेतला आहे. याचा अर्थ Windsurf आता इतर कंपन्यांनाही आपली तंत्रज्ञान विकू शकते. ही डील पूर्ण अधिग्रहण नसली तरी, Google ने Windsurf च्या संपूर्ण AI टीमला आपल्या DeepMind विभागात आणून एक मोठा खेळ खेळला आहे.
Google DeepMind चे CEO डेमिस हासाबिस यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर या नव्या टीमचं स्वागत करताना हे “एजेंटिक कोडिंग” च्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं आहे.
वरुण मोहन: एक थिंकिंग इंजिनीयर
वरुण मोहन हे Windsurf चे सह-संस्थापक आणि माजी CEO आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सनीवेल शहरात झाला. त्यांचे पालक भारतीय स्थलांतरित आहेत. वरुण यांनी The Harker School, सैन होजे येथून शिक्षण घेतले, जिथे त्यांनी गणित आणि संगणक ऑलिंपियाडमध्ये आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली.
MIT मधील शिक्षण
2014 ते 2017 या कालावधीत वरुण यांनी MIT (Massachusetts Institute of Technology) येथून इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग आणि संगणक शास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. त्यांचा अभ्यास प्रामुख्याने ऑपरेटिंग सिस्टिम्स, मशीन लर्निंग, डिस्ट्रिब्युटेड कम्प्युटिंग आणि अल्गोरिदम्स यावर आधारित होता.
व्यावसायिक प्रवास
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वरुण यांनी Nuro, Quora, LinkedIn, Databricks आणि Samsung यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम केलं. त्यांची खासियत म्हणजे ते गुंतागुंतीच्या अल्गोरिदम्सना प्रत्यक्ष उत्पादन कोडमध्ये प्रभावीपणे रूपांतरित करू शकतात.
Windsurf ची कहाणी
2021 मध्ये वरुण मोहन आणि त्यांचे MIT मधील मित्र डगलस चेन यांनी मिळून Codeium नावाचं एक स्टार्टअप सुरू केलं. पुढे याचं नाव बदलून Windsurf करण्यात आलं. सुरुवातीला कंपनी GPU वर्च्युअलायझेशन तंत्रज्ञानावर काम करत होती. मात्र नंतर त्यांनी आपला फोकस AI-नेटिव्ह IDE (Integrated Development Environment) आणि IDE प्लगइन्स वर केंद्रित केला.
वरुण यांच्या नेतृत्वाखाली Windsurf ने फक्त 4 महिन्यांमध्ये 1 मिलियनहून अधिक डेव्हलपर्सना आपल्याशी जोडले. कंपनीने $243 मिलियनची फंडिंग मिळवली आणि $1.25 बिलियनची व्हॅल्युएशन मिळवून एक यशस्वी युनिकॉर्न बनली.