‘लक्ष्मण हाके पैशांसाठी काहीपण…’, जवळच्या सहकाऱ्याने केले गंभीर आरोप

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या एका जवळच्या सहकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आंदोलनाची राज्यभर दाहकता वाढलेली असताना लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाच्या बाजूने मोठं रान उठवलं होतं. मात्र आता तेच लक्ष्मण हाके  जवळच्या सहकाऱ्यांनी केलेल्या विविध आरोपांमुळे अडचणीत येताना दिसत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अडचणींचा डोंगर वाढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशाणा साधला होता. आता हाकेंवरच त्यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे हनुमंत धायगुडे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

जवळच्या सहकाऱ्याचे गंभीर आरोप

लक्ष्मण हाके ओबीसी समाजाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करतात, असा दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये धायगुडे म्हणतात की, “हाके हा समाजकारणातील राखी सावंत आहे. तो फक्त प्रसिद्धी, टीआरपी आणि पैशासाठी काहीही करायला तयार असतो. त्याला ओबीसी, गावगाडा किंवा अठरापगड जातींच्या समाजाशी काही देणं-घेणं नाही. तो एक भुरटा लुटारू आहे.”, असं म्हणत धायगुडेंनी हाकेंवर आरोप केलेत.

अजित पवारांविरोधात बोलणं भोवलं

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना, “अजित पवार आठ दिवस सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. त्यांनी मागासवर्गीय समाजाचा निधी आपल्या लाडक्या बहिणीसाठी वळवला,” असा आरोप केला होता. या वक्तव्यानंतर अजित पवार गटातील युवकांचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी, “हाके याला महाराष्ट्रात कुठे फिरू देणार नाही,” असा इशाराही दिला होता. त्याचबरोबर, अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की, “हाके यांनी स्वतःची गाडी फोडण्याची सुपारी आपल्याच लोकांना दिली होती,” जेणेकरून सहानुभूती मिळवता येईल.

आता अगदी जवळच्या सहकाऱ्यानेच आरोप केल्याने, लक्ष्मण हाके यांच्यावर सामाजिक आणि राजकीय पातळीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या भूमिकेबाबत समाजात आणि त्यांच्या समर्थकांमध्येही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता लक्ष्मण हाके राज्यात बॅकफूटवर जातील अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News