Pankaja Munde – आज वातावरणात प्रदूषण होत आहे, यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे एक झाड आई-वडिलांसाठी तर एक झाड हे आपल्या सृष्टीमातेसाठी लावावे आणि त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे आज केले. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळेच पर्यावरणाला घातक असणाऱ्या एकल प्लास्टिक वापराचा भस्मासूर आपल्याला रोखायलाच हवा, यासाठी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक उपयोग करावा. त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी कचरामुक्त परिसरावरही लक्ष केंद्रित करून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
वृक्षारोपणाकडेही प्रत्येकाने लक्ष द्यावे…
दरम्यान, आज परळी शहरातील आनंदधाम येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ मंदिरात ‘नो प्लास्टिक’ उपक्रमा अंतर्गत कापडी पिशवी मशीनचे उदघाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. वृक्षारोपणाचे कार्यक्रम केवळ राजकीय स्वरूपात करू नका. फोटो पुरते करू नका. तर ते वृक्ष जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा

असे आवाहन पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक वृक्ष माॅ के नाम’ हा उपक्रम जाहीर केला आहे. यामध्ये एक आपली आई जीने आपल्याला जन्म दिला तिच्यासाठी एक वृक्ष व दुसरी आपली आई म्हणजे ही सृष्टी, तिच्या संवर्धनासाठी एक वृक्ष लावला पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. असेही त्या म्हणाल्या.
प्लास्टिकमुक्तीचा दृढ संकल्प व कचरामुक्तीची कास धरा…
महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये ही जाणीव जागृती निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असून सर्व देवालयांशी व देवस्थानांशी बोलून याबाबत आपण पुढचे पाऊल टाकणार आहोत. सध्या पर्यावरण विभागाच्या वतीने अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीवर भर दिला जात आहे. या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जात असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला पाहिजे. नागरिकांनी अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करावा त्यासाठी घरातील पिशवी आणावी किंवा आपण ठिकठिकाणी कापडी पिशव्यांचे मशीन बसवणार आहोत याचा अधिकाधिक वापर करावा.
तसेच यापुढे एकल प्लास्टिक वापरावर बंधने आणून अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी केले. आणि अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीसाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण प्लास्टिक मुक्तीची व स्वच्छतेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. मध्य प्रदेशातील स्वच्छतेसारखे आपले राज्यही स्वच्छ करुया, असे आवाहनही मंत्री मुंडे यांनी केले