अमेरिकेत इस्रायली समर्थकांवर हल्ला, नागरिकांवर पेट्रोल बाँब फेकले, 8 जण आगीत होरपळले

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एका इस्रायली समर्थक ग्रुपकडून रन फॉर देअर लाईव्हस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वॉशिंग्टन डीसी – अमेरिकेत इस्रायली नागरिक आणि इस्रायली समर्थकांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. अमेरिकेच्या कोलोराडा राज्यात बोल्डर शहरात रविवारी एका संशयितानं काही इस्रायली समर्थकांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. हल्लेखोरानं नागरिकांवर मोलोटोव मॉकटेल फेकलं, त्यानंतर घटनास्थळी आग लागली. या आगीत होरपळून आठ जणं जखमी झाले आहेत. हल्लेखोर हे कृत्य करताना फ्री पॅलेस्टाईनच्या घोषणा देत होता.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एका इस्रायली समर्थक ग्रुपकडून रन फॉर देअर लाईव्हस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हा हल्ला करण्यात आला. या कार्यक्रमात हमासनं गाझामध्ये कैद केलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेची मागणी करण्यात येत होती.

हल्लेखोर नेमका कोण?

पोलिसांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केलीय. मोहम्मद साबरी सोलिमान असं या 45 वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे. अमेरिकेत शरणार्थी होण्यासाठी सोलिमाननं काही दिवसांपूर्वी अर्ज केल्याची माहितीही समोर आलीय. 2005 साली सोलिमानला अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा देण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र तरीही सोलिमान अमेरिकेत आला आणि त्यानं हा हल्ला केला. आता सोलिमान अमेरिकेत आला तरी कसा याचाही तपास करण्यात येणार आहे.

हा दहशतवादी हल्ला- एफबीआय

अमेरिकेची तपास यंत्रणा असेलल्या एफबीआयनं प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. वैचारिक द्वेषातून प्रेरित दहशतवादी हल्ला असल्याचं मत एफबीआयच्या डेप्युटी डायरेक्टरनी व्यक्त केलंय. जेव्हा याबाबतचे पुरावे समोर येतील, तेव्हा या प्रकरणाची विस्तृत माहिती देण्यात येईल असंही एफबीआयच्या वतीनं सांगण्यात आलंय.

इस्रायली समर्थकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती बोल्डरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. या हल्ल्यातील पीडितांच्या जखमा पाहता त्यांना जिवंत जाळण्याचा हा कट असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. या प्रकरणात तातडीनं एखाद्या निष्कर्षावर येणं चूक ठरेल, अशी सारवा-सारवही करण्यात आलीय. घटनेनंतर या परिसरातून सुरक्षेत वाढ करण्यात आली असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलंय.

गेल्याच महिन्यात इस्रायली दुतावासात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यात गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. फ्री पॅलेस्टाईनच्या घोषणा देत हा गोळीबार करण्यात आला होता. आताच्याही घटनेत हल्लेखोर याच घोषणा देत होता. या दोन्ही हल्ल्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा तपास आता एफबीआय आणि अमेरिकेन पोलीस करतायेत.


About Author

Smita Gangurde

Other Latest News