मुंबई : काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा त्यांना भाजपमध्ये आणा, असा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार काँग्रेसचे विधीमंडळनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले, दुसऱ्याची घरे फोडण्याची सवय भाजपाला लागली आहे.
सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. समाजा-समाजाला जोडण्याचे काम होत आहे. भाजपा २०१४ पासून देशात व राज्यात जातीयतेचे व धर्मांधतेचे विष पेरत आहे.आता भाजपा नेते काँग्रेस फोडण्याची भाषा करत आहे, असा टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला प्रतिसाद
विजय वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे सांगितले की, काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रा आणि संविधान बचाओ पदयात्रेला परभणीकरांचा मोठा प्रतिसाद.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी श्री.रमेश चेन्नीथलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नेतृत्वाखाली आज परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली.
मोदींवर जनतेचा विश्वास राहिला नाही
राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, याचा फायदा मागास, वंचित, पीडित लोकांना होईल. जातनिहाय जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा भाजपा व मोदी यांनी त्याला विरोध केला पण शेवटी मोदी सरकारला जनगणनेचा निर्णय घ्यावाच लागला. मोदींवर जनतेचा विश्वास राहिला नाही, महिला आरक्षण विधेयक पास केले पण त्याची अंमलबजवाणी केली नाही. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला पण तो कधी होईल हे जाहीर करत नाहीत, असे देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
राज्यात कायदा सुव्यवस्था नाही
सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रश्नी राहुल गांधी यांनी आवाज उठवला, या घटनेला तीन महिने झाले तरी तरी अद्याप सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही, मुख्यमंत्री फडणीस यावर काही बोलत नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, अशी टीका देखील सरकारवर विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.