कराची : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आपल्यावर कधीही हल्ला करेल, याची धास्ती पाकिस्तानला आहे. भारत पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग गडद होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य हे कारवाईसाठी दिले आहे. पाकिस्तान युद्ध भूमीवर भारतासमोर टिकाव धरू शकत नसल्याची कबूली पाकिस्तानी नागरिकच देत आहेत. त्यात पाकिस्तानातील खासदाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी खासदार शेर अफजल मरवत यांना पत्रकाराने विचारले की जर भारत पाकिस्तान युद्ध झाले तर ते बंदुक घेऊन बाॅर्डरवर लढण्यासाठी जातील का? या प्रश्नावर शेर अफजल मरवत यांनी जर युद्ध झाले तरी मी इंग्लंडला निघून जाईल, असे सांगितले. त्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

नरेंद्र मोदी माझे का ऐकतील?
पत्रकाराने दुसरा प्रश्न शेर अफजल मरवत यांना विचारला की, दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम दाखवत मागे हटायला पाहिजे, असे तुम्ही त्यांना सांगाल का? त्यावर मरवत म्हणाले, मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का? मी सांगायला आणि त्यांनी ऐकायला असा प्रतिप्रश्न केला.
भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी?
भारत पाकिस्तान युद्धा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भारताने पाकिस्तानवर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक केली आहे. पाकिस्तानसोबत होणार सगळाच व्यापार भारताने थांबवला आहे. तसेच सिंधू जलकराराला स्थगिती दिली असून चिनाबमधून जाणारे पाणी देखील थांबण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका पाकिस्तानच्या व्यापाराला बसत असल्याचे दिसून येत आहे.