मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या झाली.आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून वैभवी देशमुख आपल्या काकांसोबत महाराष्ट्रभर आंदोलन करत होती. नेत्यांच्या गाठीभेटी घेत होती. या सगळ्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर होत होता. यंदा तिचे बारावीचे वर्ष होते. त्यामुळे तिला किती मार्क पडतात याची उत्सुकता होती. तिने या खडतर परिस्थितीमध्ये तब्बल 86.33 टक्के गुण मिळवले. तिच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी तिचे कौतुक केले आहे.
शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आपल्या जन्मदात्याची सावली हरवण्याएवढे दुःख आणि दुर्दैव नाही हे खरेच, पण अशा परिस्थितीला धीराने सामोरे जाताना भूतकाळाला गाडून टाकून भविष्याच्या वाटेवरचे काटे दूर करण्याचे आव्हान पेलणे ही नियतीची खरी कसोटी असते. संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी मृत्यूने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा आणि संकटाचाही डोंगर कोसळला, पण त्याने खचून न जाता वैभवी आपले शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी सज्ज, सजग राहिली.

अशक्य काहीच नाही
शिंदें यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, घरात दुःखाचं काजळ पसरलेलं, हक्काच्या माणसाचा अचानक उठलेला आधार, आणि अस्वस्थ करणारे दडपण. या सगळ्या नैराश्यात ही वैभवीने तिच्या वडिलांचं स्वप्न उराशी घेऊन अभ्यासात स्वतःला झोकावून दिले. आसवांतून अक्षरं ओळखली, वेदनेतून शब्दांचा अर्थ लावला, आणि काळजातली खोच सांभाळत पुस्तके हाताळली. हे सहज नव्हतं. पण वैभवीने हार मानली नाही. 85.33 टक्के गुण मिळवून वैभवीने सिद्ध केलं की, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मनात जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही.
तुझे यश प्रेरणादायी
तुझ्या यशाबद्दल तुझे अभिनंदन. यशाची पुढची शिखरे पादाक्रांत करताना समोर येणारी कोणतीही आव्हाने तू अशाच आत्मविश्वासाने परतवून लावशील आणि यशाला पायाशी लोळण घेणे भाग पाडशील. वैभवी, तुझ्या या यशाला फक्त शैक्षणिक यश म्हणणं अन्यायकारक ठरेल. तुझे आजचे यश म्हणजे हजारो लोकांना संकटांशी, दुःखाशी सामना करण्याची प्रेरणा आहे. ती अशीच प्रज्वलित राहू दे, अशा शुभेच्छा देखील शिंदे यांनी वैभवीला दिल्या आहेत.