मे महिना सुरू झाल्यानंतर उन्हाचा तडाखा काहीसा नियंत्रणात आल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे. असे असले तरी सध्या बंगालचा उपसागर आणि मध्य भारतातून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहेय परिणामी या भागतील छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांत आगामी काही दिवसांत सौम्य ते मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये गारपीटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. हवामान विभागाने तसा इशारा दिला आहे.
6 ते 10 मे पाऊस आणि गारपीट?
हवामान विभागाने आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच 6 मे ते 10 मे पर्यंतचा अंदाज वर्तवलेला आहे. यामध्ये हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मधल्या काळात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव या जिल्ह्यांत तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते असा अंदाज भारतीय हवामान विभागकडून वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली असून, जालना शहरासह जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे.वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीचा देखील तडाखा बसला आहे.
‘या’ राज्यांतही पाऊस बरसणार
महाराष्ट्राप्रमाणेच देशातील अनेक भागांना हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी प्रतितास एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये देखील पाऊस होईल, असा अंदाज आहे.
राज्यात गारपिटीची शक्यता असल्यानं हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या काळात वीज कोसळणे अथवा गारांचा मारा बसणे अशा घटना घडतात, अनेकजण जीवाला मुकतात, त्यामुळे हवामान विभागाने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.