भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात उद्या मॉक ड्रिल होणार आहे. केंद्र सरकारकडून उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील 244 प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून तसे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. मॉक ड्रिल्समुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची तयारी तपासली जाते आणि भविष्यातील आपत्तींना त्वरित आणि प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आवश्यक सुधारणा ओळखल्या जातात.
मॉक ड्रिलची प्रक्रिया नेमकी कशी?
शाळा, मॉल, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मॉक ड्रील म्हणजेच सराव कवायती आयोजित करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केल्या आहेत. या काळात, विद्यार्थी आणि नागरी संरक्षणाशी संबंधित लोकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा निश्चित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॉक ड्रिल ही युद्ध किंवा आपत्तीसारख्या कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीपूर्वी केलेली तयारी असते.

साधारणपणे मॉक ड्रिलची उद्दिष्टे निश्चित केली जातात, जसे की आग लागणे, वायू गळती, भूकंप, युद्ध इत्यादी. सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या सांगितल्या जातात. नियोजित आपत्तीची परिस्थिती तयार केली जाते, जसे की युद्ध होणे, आग लागणे, वायू गळती किंवा इतर कोणतीही आपत्ती. त्यानंतर सर्व सहभागी आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद देतात, जसे की इमारत रिकामी करणे, बचाव कार्य करणे, प्राथमिक उपचार देणे इत्यादी. मॉक ड्रिलनंतर सर्व सहभागींचे मूल्यांकन केले जाते. काय चांगले झाले आणि काय सुधारणा आवश्यक आहे, यावर चर्चा केली जाते.
सध्या मॉक ड्रिलची गरज काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. युध्दजन्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत युध्द सुरू झाल्यास आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांची सुरक्षितात महत्वाची असते. अशावेळी नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे, वैद्यकीय काम करणाऱ्यांना प्रशिक्षण देणे, सैन्य अथवा पोलिसांना सज्ज ठेवणे यासाठी मॉक ड्रिल घेतली जात आहे.
राज्यात कुठे होईल मॉक ड्रिल?
मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत , पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये होणार मॉक ड्रिल केली जाईल.
नाशिक, सिन्नरला असणाऱ्या लष्करी छावण्या, मनमाडला असणारा पेट्रोलियम डेपोमुळे तीन ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस याबाबत अत्यंत महत्वाचा असणार आहे.