Jail Premier League : उत्तर प्रदेशातून एक रंजक बातमी समोर आली आहे. युपीच्या मथुरा येथील जेल प्रशासनाने कैद्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला आणि कैद्यांची क्रिकेट स्पर्धा भरवली. यामागचा उद्देश कैद्यांची शारीरिक हालचाल वाढवणे आणि मानसिक तणाव कमी करणे हा होता, असे जेल प्रशासनाने सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मथुराच्या जिल्हा कारागृहात JPL म्हणजेच जेल प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली. कैद्यांची संख्या लक्षात घेता ८ संघ तयार करण्यात आले होते आणि त्यांना आयपीएलमधील संघांसारखीच नावे देण्यात आली. एका महिन्यात १२ पेक्षा जास्त सामने खेळवले गेले. १४ मे रोजी या जेल प्रीमियर लीगचा अंतिम सामना झाला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर आता या उपक्रमाची खूप प्रशंसा केली जात आहे.

८ संघांमध्ये १२ लीग सामने
जेल अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांना प्रत्येकी ४-४ संघांमध्ये विभागून २ गट तयार करण्यात आले होते. एकूण ८ संघांमध्ये १२ लीग सामने खेळवले गेले. संघांना टायटन्स, रॉयल्स, कॅपिटल्स, नाईट रायडर्स अशी आयपीएल संघांसारखी नावे देण्यात आली होती. पहिला सामना टायटन्स आणि रॉयल्स यांच्यात झाला होता, ज्यामध्ये टायटन्स संघ विजयी झाला. आयपीएलसारखेच फक्त ४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले, तर उर्वरित संघ स्पर्धेतून बाहेर पडले.
नाईट रायडर्स आणि कॅपिटल यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात नाईट रायडर्स संघाने कॅपिटलला पराभूत करून ट्रॉफीवर आपला कब्जा मिळवला. या स्पर्धेनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात आली.
अंपायर, कॉमेंट्री JPL मध्ये सर्वकाही
विशेष म्हणजे, ‘जेल प्रीमियर लीग’मध्ये मैदान, अंपायर, कॉमेंट्री आणि ट्रॉफी अशा सर्व गोष्टींचा समावेश होता. जेल अधीक्षकांनी उद्घाटन करत ही स्पर्धा सुरू केली होती. यामुळे कैद्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, त्यांच्या वर्तनातही सकारात्मक बदल दिसून आल्याचे प्रशासनाने सांगितले.