म्युच्युअल फंड की एफडी… गुंतवणुकीसाठी उत्तम काय? पैसे गुंतवण्यापूर्वी सर्वकाही समजून घ्या

म्युच्युअल फंड, विशेषतः इक्विटी फंड, दीर्घकालीन कालावधीत अधिक चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतात. दुसऱ्या बाजूला, याचा अर्थ असा ही होतो की तुम्हाला बाजारातील चढ-उतार सांभाळण्याची तयारी ठेवावी लागेल.

Mutual Funds vs FD: म्युच्युअल फंड आणि फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणुकीचा विचार आला की मनात हमखास प्रश्न येतो, तो म्हणजे यापैकी कोणत्या योजनेत पैसे गुंतवणे अधिक योग्य ठरेल? कोणता पर्याय आपल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी अधिक उपयुक्त आहे? खरं तर, या दोन्ही योजनेचे त्यांच्या-त्यांच्या पातळीवर फायदे आहेत, पण ते वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करतात.

जर एखादी व्यक्ती किमान जोखमीसह निश्चित रिटर्न शोधात असेल, तर एफडी एक सोपा आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. पण जर तुम्हाला वेळोवेळी जास्त रिटर्नची अपेक्षा असेल आणि थोडी अधिक जोखीम पत्करण्यास तयार असाल, तर म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी अधिक योग्य पर्याय ठरू शकतो.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड ही अशी गुंतवणूक आहे, ज्यात अनेक लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि त्यानंतर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या वतीने गुंतवणूक केली जाते. हे फंड इक्विटी, बाँड किंवा दोन्हींच्या संयोगात गुंतवले जाऊ शकतात. म्हणजेच, फंडच्या प्रकारानुसार जोखीम आणि त्यावर मिळणारा परतावा वेगळा असतो.
जर तुम्ही जास्त रिटर्नची शक्यता असलेल्या इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक कराल, तर त्यात बाजारातील चढ-उतारांमुळे जोखीमही जास्त असते कारण त्याची किंमत शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते.
तर दुसरीकडे, डेट फंड तुलनेने स्थिर असतात, ज्यात जोखीम कमी असते आणि त्यावर मिळणारा परतावा देखील कमी असतो.

एफडीमध्ये म्युच्युअल फंडच्या तुलनेत परतावा

तज्ञांच्या मते, म्युच्युअल फंडचे वैशिष्ट्य म्हणजे, यात तुम्ही अत्यंत कमी जोखीम असलेल्या फंडपासून ते अधिक जोखीम व अनपेक्षित परतावा देणाऱ्या रोमांचक फंडपर्यंत निवड करू शकता.

दुसरीकडे, फिक्स्ड डिपॉझिट हे फारच सरळ आणि ठराविक स्वरूपाचे असतात. यात तुम्ही निश्चित व्याजदराच्या बदल्यात एकमुश्त रक्कम ठरावीक कालावधीसाठी गुंतवता. या कालावधीमध्ये ती रक्कम गुंतवलेली राहते आणि जोखीम जवळपास शून्य असते, परंतु परतावा सामान्यतः म्युच्युअल फंडच्या तुलनेत खूपच कमी मिळतो.

जर कोणी सुरक्षा आणि निश्चिततेला प्राधान्य देत गुंतवणूक करू इच्छित असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट हा त्यांच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. याशिवाय, भारतात ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेव रकमेवर विमा कवच उपलब्ध असते, त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित आहेत याची खात्री बाळगता येते.

म्युच्युअल फंड, विशेषतः इक्विटी फंड, दीर्घकालीन कालावधीत अधिक चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतात. दुसऱ्या बाजूला, याचा अर्थ असा ही होतो की तुम्हाला बाजारातील चढ-उतार सांभाळण्याची तयारी ठेवावी लागेल, कारण ते कधी तुमच्या बाजूने असू शकते किंवा कधी नुकसानही सहन करावे लागू शकते. याच्या उलट, एफडीवरील परतावा बर्‍यापैकी अंदाजाने ठरलेला असतो.

तुम्हाला हे ठाऊक असते की तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी तुमच्याकडे किती पैसे असतील. जर तुम्ही निश्चितता पसंत करणाऱ्यांपैकी असाल, तर एफडी तुम्हाला मानसिक शांतता देऊ शकते. पण जेव्हा तुमच्या निधीला पुरेसे वाढवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा म्युच्युअल फंड एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर.

टॅक्स सवलतीबाबतचे नियम

म्युच्युअल फंड तुलनेत अधिक कर अनुकूल मानले जातात, विशेषतः जेव्हा तुम्ही ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम) सारख्या टॅक्स सेव्हिंग पर्यायांमध्ये गुंतवणूक करता, जे आयकर कलम ८०C अंतर्गत कपात मिळवण्याची संधी देतात. मात्र, जर तुमची गुंतवणूक डेट फंडमध्ये असेल, तर त्यावरील टॅक्स थोडा अधिक वाटू शकतो. दुसरीकडे, एफडी अशा कोणत्याही विशेष सवलती देत नाही. एफडीवर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र असते आणि त्यामुळे तुमचा परतावा कमी होऊ शकतो.

उत्तम काय?

म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला खूप लवचिकता असते. तुम्ही तुमच्या युनिट्स कधीही रिडीम करू शकता, जरी काही वेळा एक्झिट लोड किंवा कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागू शकतो. पण बहुतांश वेळा, जर तुम्हाला तुमच्या पैशांची गरज असेल, तर तो मिळवणे तुलनेत खूप सोपे असते.

पण एफडीसोबत अडचण अशी असते, की त्यामध्ये एक लॉक-इन कालावधी असतो. जर तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागते आणि तुमचा परतावा अपेक्षेपेक्षा कमी मिळतो.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News