कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या, देवनार डम्पिंग ग्राऊंडवरुन आशिष शेलारांची ठाकरे गटावर बोचरी टिका 

ज्यांनी ज्या कामासाठी ४,५०० कोटीची निविदा दिली, मलाई खाल्ली आणि पळ काढला तेच आता २,३६८ कोटी कशाला खर्च करताय? म्हणून ओरडत आहेत.

Ashish Shelar – आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तसेच आरोप प्रत्यारोप आणि टीका टीप्पणीही केली जात आहे. दरम्यान, आता ग्राउंड साफ करण्यासाठी २,३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आणि कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरुन या देवनार क्षेपणभूमीवर घिरट्या घालू लागले आहे. असा हल्लाबोल भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवरुन ठाकरे गटावर केला आहे. यावरुन त्यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत शिवसेना (ठाकरे) गटावर टीका केली आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

हेच कावळे, गिधाडे आणि बगळे याच कचऱ्यावरचे कटकमिशन खाऊन गेल्या पंचवीस वर्षात गलेलठ्ठ झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन, आरोप करताना आज त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत .. म्हणून सांगतो..

1) सन. २००८ साली आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेत सत्ता असताना देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढण्यात आली त्याची किंमत ४,५०० कोटी होती.

2) आतापर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.

3) आम्ही त्यावेळी या कंत्राटाला विरोध केला होता, या कंत्राटामध्ये अनेक उणीवा आहेत हे आम्ही दाखवले होते. हा निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी मुंबईकरांसमोर उघड केली होती.

4) पण आमच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४,५०० कोटी रुपयांची देवनार डम्पिंग ग्राउंडची निविदा मंजूर केली. कटकमिशन खाल्ले आणि पुढे काहीच झाले नाही.

5) कचऱ्याचे ढिगारे देवनारमध्ये आजही कायम आहेत, दुर्गंधीने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. दमा, फुफ्फुसाच्या आजारांनी मुंबईकर गेली ४० वर्षे हैराण झाले आहेत.

6) देवनार डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करा अन्यथा एक वर्ष मुंबईतील नव्या बांधकामावर बंदी आणा असे सांगून न्यायालयाने झोडपून काढेपर्यंत सत्ताधारी म्हणून उबाठाने काहीच केले नाही.

7) ४,५०० कोटीचे कंत्राट दिले त्याचा हिशेब कोण देणार? आता हेच पालिका कचरा उचलण्याची निविदा काढली तरी ओरडणार…

मुंबईकर हो समजून घ्या…

ज्यांनी ज्या कामासाठी ४,५०० कोटीची निविदा दिली, मलाई खाल्ली आणि पळ काढला तेच आता २,३६८ कोटी कशाला खर्च करताय? म्हणून ओरडत आहेत. मग त्यांनी देऊ केलेले ४,५०० कोटी मोठे की, आजचे २,३६८ कोटी?

ज्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार येथील जागा दिली जाणार आहे, त्यातील एक इंच ही जागा अदानीच्या नावावर होणार नाही. धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास होताना मुंबई महापालिका, सरकार यांना महसूल मिळेल, अपात्र झोपडपट्टी वासीयांना ही घर मिळणार, मोकळी मैदाने, बगीचे, शाळा अशा सुविधा मुंबईकरांना मिळणार आहेत तरीसुद्धा या प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का? असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News