इस्लामाबाद– पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांची मुलगी आणि खासदार आसिफा भुट्टो यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर शुक्रवारी जमावानं हल्ला केला. शनिवारी या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. आसिफा कराचीहून नवाबशाहाला जात असताना हा प्रकार घडला. आंदोलनकर्त्यांनी आशिफा यांचा ताफा थांबवला आणि वादात सापडलेल्या कॅनॉल योजना आणि कॉर्पोरेट शेतीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी लाठ्या काठ्यांनी गाड्यांवर हल्लाही केला.
आसिफा यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनी सतर्कता दाखवत, लागलीच कारवाई केली. या गोंधळातून सुरक्षारक्षकांनी आसिफा यांची कार सुरक्षितरित्या बाहेर काढली. सुदैवानं या घटनेत गंभीर प्रकार होता होता टळला.

पाकिस्तानी नागरिकांचा का होता रोष?
पाकिस्तान सरकारनं सिंधू नदीवर कालवा बांधण्याचं नियोजन केलंय. स्थानिकांचा या योजनेला विरोध आहे. या नाराज स्थानिकांनी मंगळवारी सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचं घरही जाळलं होतं.
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानातील हा नवा असंतोष आता जगासमोर आला आहे. ज्या परिसरात ही घटना घडली त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. आसिफा यांचा ताफा केवळ एका मिनिट भरासाठी थांबवण्यात आला होता आणि या आंदोलनात आसिफा आणि सुरक्षारक्षक यांना कोणतीही इजा झाली नसल्याचा दावा करण्यात आलाय. प्रत्यक्षात मात्र व्हिडीओत जमाव चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय. अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येतंय.
सिंधच्या गृहमंत्र्यांचं घरही भस्मसात
सिंध नदीवरील कालव्याला विरोध असणाऱ्या आंदोलकांनी मंगळवारी सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांच्या घरावरही हल्ला केला होता. घराबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना चोप देत त्यांनी घराला आग लावली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातून स्थानिक नागरिक सरकारच्या विरोधात बंड करु लागल्याचं पाहायला मिळतंय. बलुच आर्मीनं स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे. बलुचिस्तान आणि पाकिस्तानी सैन्यदल यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. दुसरीकडे महागाईनं होरपळलेली जनता आता सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होताना दिसतेय.