पुणे – वैष्णवी हगवणे या सुनेचा बळी घेणाऱ्या राजेंद्र हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली असली, तरी या कटुंबाच्या मुजोरपणाच्या एकाहून एक सरस कहाण्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, वैष्णवीचा पती शशांक, दीर सुशील हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली असली तरी वैष्णवीचा ज्या क्रूरपणे छळ करण्यात आला, ते फार भयंकर असल्याची चर्चा आहे.
५१ तोळं सोनं आणि फॉर्च्युनर गाडी देऊनही हगवणे कुटुंबीयांचं समाधान झालं नव्हतं, ते सातत्यानं वैष्णवीला त्रास देत होते. वैष्णवीच्या घरातून सातत्यानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी ते करत होते. वैष्णवीच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर मारहाणीच्या १० ते १५ खुणा असल्याचं आणि तिचा गळा दाबण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळं वैष्णवीची आत्महत्या होती की हत्या करण्यात आली, असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय.

हगवणे कुटुंबाच्या एकाहून एक सरस मुजोरपणाच्या कहाण्याही आता समोर येऊ लागल्या आहेत.
१. बैलांसमोर नाचवली गौतमी पाटील
हुंड्याच्या पैशांवर माज करणाऱअया राजेंद्र हगवणे यांच्या घरातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राजेंद्र हगवणे हा बैलगाडा शर्यतीचा शौकिन आहे. एका बैलाच्या वाढदिवशी त्यानं बैलासमोर चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आता या घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. घरात सुनांना रानटी वागणूक देणाऱ्या राजेंद्र हगवणेचा हा शौक केवळ बडेजाव मिरवण्यासाठी होता.
२. सुनेचं मरण, हगवणेंचं मटन
वैष्णवी आत्महत्येच्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार होते. या सात दिवसांत राजेंद्र हगवणे ११ ठिकाणी मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरत असल्याचं समोर आलंय. या सगळ्या काळात फरार होण्यासाठी अनेक जणांनी हगवणे कुटुंबाला मदत केल्याचं सांगण्यात येतंय. इतकंच काय तर अटकेपूर्वी सुनेचा मृत्यू झालेला असतानाही हगवणे कुटुंब मटण पार्टी करत असल्याचं समोर आलंय.
५१ तोळं सोनं बँकेत गहाण
वैष्णवीच्या कुटुंबाकडून घेतलेलं ५१ तोळे सोनं हगवणे कुटुंबानं बँकेत गहाण ठेवल्याचं आता समोर आलंय. ५१ तोळे सोनं, सात किलो चांदींची भांडी, फॉर्च्युनर गाडी अशा बऱ्याच गोष्टी कस्पटे कुटुंबानं हुंड्यात हगवणेंना दिल्या होत्या. तरीही त्यांची हाव संपत नव्हती. हगवणेंनी कस्पटे कुटुंबाकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे मिळत नसल्यानं वैष्णवीचा मानसिक आणि शारीरीक छळ करण्यात येत होता. ५१ तोळं सोनं गहाण ठेऊन मौजमजा करणाऱ्या हगवणे कुटुंबाकडे दोन पिस्तूल असल्याचंही समोर आलंय. आता त्यांचा परवानाही रद्द करण्यात आलाय.