‘मराठा लष्करी भुप्रदेश’ म्हणून 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत; वारसा यादीतील समावेशामुळे काय फायदा होणार?

'मराठा लष्करी भुप्रदेश' म्हणून 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. वारसा यादीतील समावेशामुळे काय फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊ...

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, पन्हाळ्यासह 11 किल्ले आहेत तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीतील समावेशामुळे नेमका काय फायदा होणार ते सविस्तर जाणून घेऊ…

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ह्ज या पाच स्थळांचा या आधीच समावेश होता. त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाला आहे.

नेमके कोणते किल्ले युनेस्कोच्या यादीत?

राज्यातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती. त्यानुसार आता रायगड, राजगड, लोहगड, खांदेरी, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, साल्हेर आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा लष्करी भुप्रदेश म्हणून या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युनेस्कोच्या या निर्णयाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची गोष्ट ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

युनेस्को यादीतील समावेशामुळे काय फायदा?

किल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे त्यांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित होते. त्यामुळे पर्यटन वाढते, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात. याशिवाय, किल्ल्यांच्या जतनासाठी निधी मिळण्याची शक्यता वाढते, तसेच त्यांचे वैज्ञानिक व तांत्रिक दृष्टीने संवर्धन होते. यामुळे स्थानिक लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होते आणि वारसा जपण्यासाठी सहकार्य मिळते. शिक्षण व संशोधनाला गती मिळते. युनेस्कोचा दर्जा मिळाल्याने जागतिक स्तरावर त्या स्थळाचे महत्त्व वाढते, जे दीर्घकालीन सांस्कृतिक जतनासाठी उपयुक्त ठरते. किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून ते संस्कृतीचे जिवंत प्रतीक बनतात.


About Author

Rohit Shinde

Other Latest News