Raj-Uddhav – राज्यात सध्या तिसरी भाषा आणि हिंदी सक्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. गुरुवारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, पाच जुलैला त्यांनी भव्य सरकारच्या विरोधात मोर्चाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ७ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे म्हटलं होतं. मात्र आता याबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे.
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/A8ATq2ra0k— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025
एकत्र मोर्चा निघेल!
हा मोर्चा एकत्रच निघणार का, अशी चर्चा होत असताना आता संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. “महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!” असं ट्विटमध्ये राऊतांनी म्हटले आहे. मागील दीड-दोन महिन्यापासून दोन ठाकरे बंधू एकत्र यावे. महाराष्ट्राच्या हितासाठी… मराठी माणसाच्या हितासाठी… एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते हे आपापल्या परीने वक्तव्य करताहेत. पण आता मराठीच्या मुद्द्यावरून दोन बंधू एकत्र येणार मोर्चा काढणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे.
मनसेकडून सेनेच्या नेत्यांना संपर्क…
दुसरीकडे आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला मोर्चा दिसेल, असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे. परंतु आता हा मोर्चा एकत्र निघावे असे मनसेच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या मोर्चासाठी मनसेच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना संपर्क साधण्यात आला आहे आणि त्यातच आता संजय राऊत यांचे सुचक ट्विट आल्यामुळे हिंदी विरोधात दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन एकत्र मोर्चा काढणार का? याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.