पंढरपूरात VIP दर्शन बंद; खोटे पास दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे निर्देश

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लाखो वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी करत असताना, ‘व्हीआयपी’ पासद्वारे होणाऱ्या दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी 6 जुलै, 2025 लाखो भाविक आणि वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. राज्यातील संतांच्या मानाच्या पालख्यांसोबतच देशभरातून विविध दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा देवस्थानाकडून वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना विशेष प्राधान्य देण्यात आहे. प्रत्येक भाविकाला विठुरायाचं दर्शन घेता यावं यासाठी मंदिर समितीने यंदा चरण दर्शन आणि मुखदर्शनाची व्यवस्था केली आहे. एकंदरीतच सध्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे. या काळात पंढरपुरात व्हिआयपी दर्शन पूर्णपणे बंद राहणार आहे. शिवाय खोटे पास वाटणाऱ्यांना कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

व्हिआयपी दर्शन बंद; भक्तांना दिलासा

पंढरपूर येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लाखो वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी करत असताना, ‘व्हीआयपी’ पासद्वारे होणाऱ्या दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना देत म्हटले आहे की, यात्रा काळात कोणत्याही प्रकारचे विशेष दर्शन पास वितरित करू नयेत. या सूचनेत प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असून, व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

राज्य शासनाच्या 2010 च्या निर्णयानुसार, यात्रा व सणांच्या प्रमुख दिवशी विशेष दर्शनास बंदी आहे. त्यामुळे यंदा दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन करून भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर या आदेशाचे उल्लंघन झाले, तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. भाविकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

आषाढी यात्रेसाठी पंढरपूर सज्ज

आषाढी एकादशी अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. लाडक्या विठुरायाची आस घेऊन हजारो वारकरी पायी दिंडी करत पंढरपूरमध्ये दाखल होतील. दरवर्षी आषाढीनिमित्त मोठ्या संख्यने वारकरी पंढरपुरमध्ये येतात, मात्र गर्दीमुळे काही भक्त कळसाचे दर्शन घेऊन परततात. परंतु यंदाच्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . त्यामुळे येणारे वारकरी आणि भक्तींची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News