ज्येष्ठ कवी गुलजार यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्रदान

कवी गुलजार यांनी अनेक सिनेमांतील गाणी लिहिली आहेत. गाणी लिहिण्यासह गझल आणि कवितादेखील त्यांनी लिहिल्या आहेत.

गुलजार म्हणजे साहित्य विश्वाला पडलेलं एक सुरेख स्वप्न…शब्दांशी खेळणाऱ्या या अवलियाबद्दल लिहिताना शब्दच तोकडे पडतात. ज्येष्ठ लेखक, गीतकार, कवी गुलजार यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यंदाच्या वर्षी 58 वा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार गुलजार यांना त्यांच्या वांद्रे येथील निवसस्थानी प्रदान करण्यात आला. प्रकृती ठीक नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी गुलजार यांना उपस्थित राहता आलं नसल्यानं राहत्या घरी त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी ज्ञानपीठचे मुदित जैन (विश्वस्त), माजी सचिव धर्मपाल आणि महाव्यवस्थापक आर.एन.तिवारी यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला. 11 लाख रुपये रोख, वाग्देवी सरस्वतीची कांस्यमूर्ती असं या पुरस्काराचं स्वरुप असल्याचं सांगण्यात आलं. त्यानिमित्ताने गुलजार यांच्या शब्दांपलिकडच्या प्रवासाचा घेतलेला आढावा…

कोण आहेत कवी गुलजार ? 

गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या झेलम जिल्ह्यात झाला. त्यांचं मूळ नाव संपूर्णसिंग कालरा. फाळणीनंतर कालरा कुटुंब भारतात स्थायिक झालं. कवी गुलजार हे एक बहुमुखी प्रतिभा असलेले भारतीय कवी, गीतकार, लेखक, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आणि साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. विशिष्ट शब्दशैलीसाठी ते ओळखले जातात. आनंद, ओंकारा, खामोशी, थोडीसी बेवफाई, दो दूनी चार, बंटी और बबली, सफर अशा अनेक सिनेमांतील गीते त्यांनी लिहिली आहेत. ‘धुआँ’ या कथासंग्रहासाठी 2002 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2004 मध्ये पद्मभूषण तर 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.

गुलजार यांच्या कारकिर्दीची प्रमुख वैशिष्ट्ये

गीतकार म्हणून सुरुवात

कवी गुलजार यांनी 1963 साली ‘बंदिनी’ चित्रपटातून गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. एस.डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी लिहिली, ज्यात ‘मोरा गोरा अंग लैले…’ यासारखी गाणी खूप प्रसिद्ध झाली.

लेखक आणि दिग्दर्शक

गुलजार यांनी अनेक चित्रपटांच्या कथा, संवाद आणि पटकथा लिहिल्या आहेत. त्यांनी स्वतः ‘किताब’ आणि ‘अकेला’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

साहित्यिक आणि कवी

गुलजार हे एक प्रसिद्ध उर्दू कवी आहेत. त्यांच्या कविता ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ यांसारख्या कविता आजही प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार

गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News