गेल्या काही दिवसांत राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे सुमारे 22,879 हेक्टर क्षेत्रावर गंभीर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांतील 86 तालुक्यांना याचा फटका बसला असून अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानीचे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अमरावती जिल्ह्याला मोठा फटका?
अमरावती जिल्हा सर्वाधिक बाधित झाला असून 10,636 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालं आहे. येथे मूग, संत्रा, कांदा, ज्वारी आणि केळी पिके प्रभावित झाली आहेत. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात 4,396 हेक्टर क्षेत्रावर मका, बाजरी, कांदा, भाजीपाला आदींचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात 1,734 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जालना 1,695 हेक्टर आणि चंद्रपूर 1,038 हेक्टर जिल्ह्यांत देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बागायती क्षेत्राला देखील मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. फळपिकांमध्ये आंबा, संत्रा, पपई, केळी यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच भात, मका, बाजरी, कांदा, मूग, उडीद, भुईमूग आणि भाजीपाला यांसारख्या पिकांनाही फटका बसला आहे.

मदत-पूनर्वसन विभागाचे आश्वासन
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून अहवाल आल्यानंतर शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तत्काळ मदतीचे पावले उचलणे अत्यावश्यक आहे. अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेता हवामान अंदाजावर आधारित संरक्षण योजनांची अंमलबजावणीही यापुढे अधिक प्रभावी करणे गरजेचे ठरत आहे.
पाऊस बरसणार, नुकसान वाढणार?
राज्यात सातत्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी गारपीट आणि अतिमुसळधार पाऊस देखील होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आज म्हणजेच 17 मे रोजीही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने 25 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेती क्षेत्राचं नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.