Mumbai – नुकतेच भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्याने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांना जीव गमावावा लागला तर यातील सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील होते. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करत अनेक दहशतवादी तळ उध्वस्त केली. यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्ध जन्य परिस्थिती होती. हे युद्ध भारताने तूर्तास थांबवले आहे. दोन्ही देशाकडून तणावाची परिस्थिती असताना आता मुंबईतील दोन ठिकाणी धमकीचा ई-मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धमकीचा ई-मेल कुठे?
दरम्यान, अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरू आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिल्याचा मेलमध्ये दावा करण्यात आला आहे. धमकी येताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात २ अतिरेक्यांना अटक…
भारत पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती असताना आणि युद्ध थांबले असताना, भारत अधिक सतर्क झाला असून, जे पाकिस्तानमधील नागरिक अद्यापही भारतात राहतात. त्यांची शोध मोहीम सुरू आहे. तसेच संशयित हालचाली दिसतायेत… बांगलादेश, पाकिस्तानमधून येणाऱ्या लोकांच्या आणि त्यांच्या हालचालीवरती ही पोलीस यंत्रणांची करडी नजर आहे.
याच पार्श्वभूमीवरराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक केली आहे. या दोघांना इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आली आणि मुंबईत आणण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मुंबईत जो धमकीचा ई-मेल आला आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.