तुळजाभवानीच्या दर्शनाला आता लागणार अधिकचा वेळ; दर्शनाच्या वेळेत मोठा बदल

आता श्री तुळजाभवानी मंदीर रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या गर्दीच्या दिवशी मंदिर पहाटे १ ऐवजी पहाटे ४ वाजता उघडणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने दर्शनाच्या वेळेत काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. काही विशिष्ट दिवशी मंदिर उघडण्याच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या गर्दीच्या दिवशी मंदिर पहाटे १ ऐवजी पहाटे ४ वाजता उघडणार आहे.

मंदिर पहाटे 4.00 वाजता उघडणार

मंदिर संस्थानने भाविकांची कमी झालेली संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, या निर्णयाला मंदिर पुजारी आणि भाविकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.यापूर्वी तुळजाभवानी मंदिर रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी पहाटे १ वाजता उघडण्याची प्रथा होती. या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी होते. मात्र या नवीन निर्णयानुसार, मंदिर आता या विशिष्ट दिवशी पहाटे ४ वाजता उघडणार आहे.याचाच अर्थ तुळजाभवानी मंदिर तब्बल तीन तास उशिराने खुले होईल. इतर दिवशी, म्हणजे सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी मंदिर सकाळी ६ वाजता उघडणार आहे.

भाविक,  पुजाऱ्यांचा निर्णयाला विरोध

मंदिर संस्थानने सार्वजनिक प्रकटनाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.या बदलामुळे एकूणच गर्दीच्या दिवशी मंदिर २२ तासांऐवजी केवळ १९ तास खुले राहणार आहे. मंदिर संस्थानच्या या निर्णयाला पुजाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांना पहाटे १ वाजता मंदिरात प्रवेश मिळत असल्याने त्यांना लवकर दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघता येत असे.आता पहाटे ४ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्यांचा वेळ वाया जाईल आणि गैरसोय वाढेल, असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे भाविकांना मोठा फटका बसणार असून, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही पुजारी वर्गाचे म्हणणे आहे.

पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानकडे पूर्वीप्रमाणेच पहाटे १ वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय कायम ठेवण्याची मागणी केली आहे. भाविकांच्या भावना आणि सोयीचा विचार करून मंदिर संस्थानने या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यासंदर्भात मंदिर संस्थान आणि पुजाऱ्यांमध्ये लवकरच बैठक होऊन काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे निर्माण झालेला वाद आता कसा मिटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. किंवा मंदिर संस्थान हा निर्णय मागे घेते का ते पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News