गडचिरोली जिल्ह्यात भीषण पुरस्थिती; अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प

राज्याच्या अनेक भागांत विशेष म्हणजे विदर्भात पावसाने कहर केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक प्रभावित झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बत्यामुळे जिल्ह्याच्या काही भागात सध्या पुरस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे गडचिरोली ते नागपूर महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे इंजिन बंद पडून दोन बसगाड्या रस्त्यातच बंद पडल्या.पाण्यात बंद पडलेल्या या दोन बसेस बाहेर काढण्यात आल्या असून त्यातील प्रवाशांची ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातच निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ठिकठिकाणच्या पुरामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यात 20 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं

राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाचा अंदाज समोर आला आहे. मान्सून सध्या सक्रीय अवस्थेत असल्याने कोकण किनारपट्टी, विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड या भागांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  शिवाय विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात या काळात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

नागपूरमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. रामनगरमधील हिल रोड ते पांढरा बोडीकडे जाणारा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा आणि महाविद्यालये आज एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार प्रशासनाने ही निर्णय घेऊन नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News