खुशखबर! मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात कधी होणार मान्सूनचं आगमन?

मान्सून आता केरळात दाखल झाला आहे, त्यासंदर्भात अधिकृत माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे एक आठवडा आधीच मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी? असा सवाल आता विचारला जात आहे.

शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे मान्सून केरळात दाखल व्हायला आणखी एक आठवडा लागू शकतो, असं सांगितलं जात असताना मान्सून एक आठवडा आधीच दाखल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस राज्यात एंट्री घेणार आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी?

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. त्यामुळे 1 ते 6 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस महाराष्ट्राचा बराच भाग व्यापेल. पुढे त्यानंतर उत्तर भारताच्या दिशेने मान्सूनची आगेकूच सुरू होत असते.

यंदा पावसाचं प्रमाण किती?

पाऊस यंदा सरासरी ओलांडू शकतो, असा अंदाज आहे. हा पाऊस देशाच्या बहुतांश भागात सरासरी ओलांडेल, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यात पावसाचं धुमशान सुरू

राज्यात सध्या पूर्वमोसमी पावसाने थैमान घातल्याचं चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर  या जिल्ह्यांत येणाऱ्या 48 तासांत अति मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. या भागात आंबा, द्राक्षे आणि केळी बागायतदारांना यंदा पूर्व मोसमी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचे चित्र आहे, शिवाय लोकांचे दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक काहीसे कोलमडले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News