वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांना त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गावी अखेरचा निरोप देण्यात आला आहे. काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण आलं. ते सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवानास शेवटची मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी वीर जवानाला निरोप दिला.
देशासाठी प्राणांची आहुती
शहीद संदीप गायकर यांचा अंत्यसंस्कार हा अत्यंत भावनिक आणि देशभक्तीने भरलेला प्रसंग होता. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या वीर जवानाचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी सन्मानपूर्वक पार पडला. संदीप गायकव हे भारतीय लष्करातील एक शूर जवान होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी वीरमरण पत्करले. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण गाव, जिल्हा आणि राज्य अभिमानाने भरून गेले.

अंत्यसंस्काराच्या वेळी लष्कराचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, स्थानिक प्रशासन, राजकीय नेते, तसेच गावकरी आणि संदीप यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात “भारत माता की जय” आणि “संदीप गायकर अमर रहे” अशा घोषणांनी आकाश दुमदुमून गेले. त्यांना शासकीय इतमामात 21 तोफांच्या सलामीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे आई-वडील, पत्नी व लहान मूल यांच्या डोळ्यांतून अश्रू आवरत नव्हते.
संदीप गायकरांचं देशप्रेम
संदीप गायकर हे शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी सैन्यात निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि धैर्याने सेवा बजावली. देशाच्या संरक्षणासाठी उभे असताना शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी समजताच गावात शोककळा पसरली. वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांचं पार्थिव अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावी 23 मे रोजी आणण्यात आले होते. आणि आज अंत्यसंस्कार करण्यात आले.