राज्यात कोरानाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे, परिणामी आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांत आणखी 45 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून पुण्यात काही रुग्ण आढळले आहेत. राज्यात या महिन्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 177 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. यातील अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईकरांचं टेन्शन वाढलं!
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत असून शुक्रवारी 23 मे रोजी नवीन 45 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 185 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून त्यांनी विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आता आरोग्य विभागाकडून केलं जात आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील 35 रुग्ण मुंबईत, 4 रुग्ण पुण्यात, 2 रायगडमध्ये, 2 कोल्हापूरात, 1 ठाण्यात आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काही रुग्ण कोरोनातून सावरले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
JN.1 व्हेरियंट धोकादायक?
भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. थायलंड, चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये अनेक रुग्ण आढळत आहेत. यावेळी कोरोनाचा JN.1 हा नवीन व्हेरियंट लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. JN.1 व्हेरियंटमुळे नाकातून पाणी येणे, खोकला, डोकेदुखी, ताप आणि काही लोकांना गंध येत नाही. तुम्हालाही अशी लक्षणे असतील तर लवकरात लवकर उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे कोणताही गंभीर त्रास होत नसल्याचे निरीक्षण आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी अशा लोकांना याचा अधिक त्रास होत असल्याची माहिती आहे.