आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी 6 जुलै, 2025 लाखो भाविक आणि वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. राज्यातील संतांच्या मानाच्या पालख्यांसोबतच देशभरातून विविध दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा देवस्थानाकडून वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना विशेष प्राधान्य देण्यात आहे. प्रत्येक भाविकाला विठुरायाचं दर्शन घेता यावं यासाठी मंदिर समितीने यंदा चरण दर्शन आणि मुखदर्शनाची व्यवस्था केली आहे. एकंदरीतच सध्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे.
सर्व भाविकांना दर्शन मिळण्याची व्यवस्था
मंदिर समितीने यंदा भाविकांसाठी चरण दर्शन आणि मुखदर्शनाची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी 6 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते महापूजा पार पडेल. मुख्यमंत्री महापूजा करत असतानाही वारकरी आणि भाविकांसाठी मुखदर्शन सुरू राहणार आहे. पंढरपूरमध्ये एकूण 12 भव्य पत्राशेड्स उभारण्यात आले असून त्यात प्रत्येकी दीड हजार वारकरी बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या शेडमध्ये पंखे, कूलर आणि विश्रांतीसाठी चटईची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात असतील आणि पावसापासून बचावासाठी मोठे मंडपही उभारण्यात आले आहेत. शेडमध्ये स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी केंद्रे आणि कचरा व्यवस्थापनाचे नियोजनबद्ध मांडणी करण्यात आली आहे. मंदिर समितीकडून मोफत खिचडी आणि चहा-पाण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परिसरात विशेष स्क्रीन्स; भक्तांसाठी सोय
पंढरपूरमध्ये यंदा विठ्ठलाचे सहज दर्शन व्हावे यासाठी ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वारकऱ्यांसाठी नदीकाठावर, मुख्य मार्गांवर आणि विश्रामस्थळांवर ‘लाइव्ह’ दर्शनाची सोय करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीच्या काठावर सुरक्षारक्षक आणि जलतरणपटू तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच व्हीआयपी दर्शन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसामान्य वारकऱ्यांना कमी वेळेत विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.