आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न; तर महापूजेचा मान नाशिकच्या दाम्पत्याला

पंढरपुरात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी देवीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

पंढरपूर: पंढरपुरात सद्यस्थितीला भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी देवीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदाच्या पूजेच्या मानकरीपदी नाशिक जिल्ह्यातील एका वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांचा ट्वीटर हँडलवर देण्यात आली आहे. आषाढी महापूजेसाठी जातेगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील कैलास दामू उगले (वय 52) आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले (वय 48) या दाम्पत्याची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे कैलास उगले यांचे वडील हे माजी सैनिक होते.

मुख्यमंत्र्यांकडून शासकीय महापूजा

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि याचे शब्दात वर्णन अशक्यप्राय आहे.

“आपल्या वारीची परंपरा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता अखंडितपणे सुरु आहे. मुघली आक्रमण व इंग्रजांच्या राजवटीतही ही परंपरा अव्याहतपणे सुरु राहिली. सातत्याने या परंपरेत वाढ होत जात आहे. दिंड्यांसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. त्यात युवकांची वाढलेली संख्या खूप समाधान देणारी आहे, राज्य शासनाने यावर्षी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न झाली,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

बळीराजाला सुखी ठेव; पांडुरंगाला साकडे

वारकरी परंपरेत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंगाला पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करताना दरवेळी एक नवीन ऊर्जा मिळते. ही आपली संस्कृतीच अलौकिक आहे. विठ्ठल-रखुमाई हे आपले आराध्य दैवत आहे. सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी व सन्मार्गाने चालण्याची बुद्धी द्यावी तसेच बळीराजाला सुखी ठेवण्याची शक्तीही द्यावी अशी प्रार्थना करतो, असे साकडे जणू मुख्यमंत्री फडणवीसांनी विठ्ठलाला घातले.

पंढरीत भक्तांची मोठी गर्दी

आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत सुमारे 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांनी हजेरी लावली आहे. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची पाच किलोमीटरपर्यंत लांब रांग लागली असून, चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News