वाहतूक नियम मोडल्यास ‘युपीआय’ने दंड भरता येणार; वाहनचालकांची डोकेदुखी कमी होणार?

मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना दंडाची रक्कम 'यूपीआय' द्वारे भरण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

वाहनचालकांसाठी काहीशी दिलासादायक अशी एक बातमी समोर येत आहे. वाहनचालकांना दंडाची रक्कम ‘यूपीआय’ द्वारे भरण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांर्तगत यूपीआयद्वारे दंडाची रक्कम स्वीकारली जात आहे. या सुविधेमुळे वाहनचालकांचा त्रास कमी होणार असून, आरटीओ प्रशासनाची डोकेदुखी कमी होणार आहे. त्यामुळे आता वेळेची नक्कीच बचत होणार आहे. शिवाय वाहनचालकांसाठी दंड भरणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

दंड भरणे अधिक सोयीस्कर होणार

पूर्वी ऑनलाइन पद्धतीने शुल्क, दंड आणि कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. कारवाईसाठी मोटार वाहन निरीक्षकांनादेखील ई-चलन मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, दंडाची रक्कम केवळ ऑनलाइनच स्वीकारली जाते. त्यासाठी केवळ डेबिट कार्डचा वापर करावा लागत होता. यूपीआयद्वारे आरटीओच्या दंडाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध नव्हती.

वाहनचालकांकडून निर्णयाचे स्वागत

अनेक वाहनचालक नियमभंग झाल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी तयारी दर्शवत. दंडाचे शुल्क कॅशमध्ये पैसे स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत होती. वाहनांवर दंड तसाच ठेवून वाहने सोडण्याची वेळ आरटीओच्या अधिकाऱ्यांवर येत होती किंवा नागरिकांना कार्डची सोय करण्यासाठी बराच वेळ ताटकळत थांबावे लागत होते. शिवाय डेबिट कार्ड नसणाऱ्यांची आणखी अडचण व्हायची, आता या नव्या पद्धतीमुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. आता ही प्रणाली अधिक सोयीस्कर होणार असल्याने वाहनचालकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नियम पाळल्यास अपघातांची शक्यता कमी होते आणि रस्त्यावरील सुरक्षितता वाढते. हेल्मेट, सीट बेल्टचा वापर, सिग्नलचे पालन आणि वेगमर्यादेचे भान ठेवणे आवश्यक आहे. शिस्तबद्ध वाहतूक समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News