तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केले ठाकरे बंधुंच्या मेळाव्याचे कौतुक; नेमके काय म्हणाले स्टॅलिन?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मुंबईमध्ये झालेल्या ठाकरेंच्या मेळाव्याचं कौतुक केलं आहे, नेमके स्टॅलिन यांंनी काय म्हटले, ते सविस्तर समजून घेऊ...

मुंबईत काल ठाकरे बंधुंचा भव्य विजयी मेळावा पार पडला. हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर सरकारने वाढत्या दबावानंतर मागे घेतला. त्यानंतर सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. या मेळाव्याची दखल खुद्द तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी घेतली. काल रात्री उशिरा स्टॅलिन यांनी एक ट्वीट करत ठाकरे बंधुंच्या या मेळाव्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे यापूर्वी तामिळनाडूमध्ये देखील हिंदी भाषा सक्तीला प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारला नमती भूमिका घ्यावी लागली होती.

नेमके काय म्हणाले स्टॅलिन?

आपल्या एक्स पोस्टमध्ये स्टॅलिन म्हणतात की, ” हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा संघर्ष आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात निषेधाच्या वादळासारखा जोर धरू लागला आहे. तामिळनाडूच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवले तरच निधी दिला जाईल असे सांगून बेकायदेशीर आणि अराजकतेने वागणाऱ्या भाजपला लोकांच्या बंडाच्या भीतीने महाराष्ट्रात दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे.”

ठाकरे बंधुंचे विशेष कौतुक

आपल्या या पोस्टमध्ये ठाकरे बंधुंचे स्टॅलिन यांनी विशेष कौतुक केल्याचे दिसते. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची पाठराखण करताना ते म्हणतात ” पूर्णवेळ हिंदी आणि संस्कृतच्या प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे श्री. #राजठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत: “उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते?” आणि “हिंदी भाषिक राज्ये मागे आहेत – तुम्ही प्रगतीशील बिगर-हिंदी भाषिक राज्यांच्या लोकांवर हिंदी का लादत आहात?”” त्यामुळे महाराष्ट्रातील या उठावाचे वारे बरेच दुरवर पोहोचले आहे.

‘महाराष्ट्रातील उठावाने डोळे उघडतील!’

हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले. त्यामधून सरकारने धडा घ्यावा, असे आवाहन स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला केले. हिंदी वर्चस्वाविरुद्ध तामिळनाडूच्या लोकांनी चालवलेला संघर्ष केवळ भावनिकच नाही तर बौद्धिक देखील आहे! ते तार्किक आहे! ते भारताच्या बहुलवादी संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे! ते द्वेषाने प्रेरित नाही! हिंदी लादल्यामुळे नष्ट होणाऱ्या असंख्य भारतीय भाषांच्या इतिहासाची माहिती नसलेले आणि भारताला हिंदी राष्ट्रात बदलण्याचा अजेंडा समजून घेण्यात अयशस्वी झालेले काही भोळे लोक “हिंदी शिकल्याने तुम्हाला नोकऱ्या मिळतील” असे वाक्ये बोलतात. त्यांनी आता सुधारणा करावी. महाराष्ट्रातील उठाव त्यांचे शहाणपणाचे डोळे उघडेल!, असे एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News