मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवी घोषणा ; ‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्ट मालिकेची होणार सुरूवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या पॉडकास्टची घोषणा केली आहे. महाराष्ट्रधर्म नावाच्या पॉडकास्टमधून महाराष्ट्राची शालिनता आणि सांस्कृतिक श्रीमंती जगासमोर येणार आहे.

आज आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यानंतर त्यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आषाढी वारीच्या शुभ दिवशी पंढरपूरच्या पवित्र भूमीतून ‘महाराष्ट्रधर्म’ या नव्या पॉडकास्ट मालिकेची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा, वारीची परंपरा आणि इतिहास यावर भाष्य करणारी ही मालिका 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.

‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्टची घोषणा

आज पंढरपुरात भक्तीमय वातावरणातच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नवीन उपक्रमाची घोषणा केली. ‘एक नवी सुरुवात करतोय…’, अशा शब्दांत त्यांनी ‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्टचे संकेत दिले.

नेमकी पॉडकास्टची संकल्पना काय ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता नव्हे तर ध्येयासाठी लढा दिला. ही वारी कोणताही इव्हेंट नाही, ही चालती-बोलती संस्कृती आहे, महाराष्ट्राचा आत्मभिमान जपणारी परंपरा आहे.” वारीच्या इतिहासात कितीही परकीय आक्रमणं झाली, तरी ही परंपरा खंडित झाली नाही, याची आठवण फडणवीस यांनी ट्रेलरमध्ये करून दिली आहे. सारांशतः, महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्रधर्म’ या माध्यमातून होणार आहे. आता या पॉडकास्ट मालिकेचा ट्रेलर समोर आला असून प्रत्यक्षात ही मालिका सुरू होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.

दुसरीकडे मराठी भाषा आणि महाराष्ट्र हित या मुद्द्यावर ठाकरे बंधुंनी रान उठवलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॅमेज कंट्रोलसाठी असा काही उपक्रम सुरू केला का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News