बारामतीच्या माळेगाव कारखान्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची नवी जबाबदारी ठरली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मोठ्या चुरशीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनलला मोठे यश मिळाले होते. शिवाय, ब वर्ग संस्थेच्या मतदारसंघातून 101 पैकी 91 मते मिळवत अजित पवार विजयी ठरले. त्यामुळे या निमित्ताने अजित पवारांचे नेतृत्व सिद्ध झाल्याची चर्चा सध्या बारामती आणि परिसरात सुरू आहे.
अजित पवारांच्या निवडीवर विरोधकांचा आक्षेप
दुसरीकडे, विरोधकांकडून या निवडीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संचालक चंद्रराव तावरे यांनी संभाजीनगर खंडपीठाचा संदर्भ देत अजित पवार यांची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, ब वर्गातून निवडून आलेल्यांना चेअरमन पदासाठी अपात्र ठरवले गेले आहे. तसेच, रंजन तावरे यांनी आरोप केला की, “अजित पवार यांनी कधीही कारखान्यासाठी ऊस गाळपासाठी योगदान दिले नाही.” त्यामुळे आता अजित पवारांच्या निवडीवर विरोधकांनी आक्षेप नोंदवला आहे. यामध्ये पुढे काय होते हे महत्वाचे ठरणार आहे.

पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ सर्व संचालक मंडळ आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली. ही मेगा मिटिंग बराच वेळ चालली असून, यामध्ये त्यांनी कारखान्याच्या भविष्यातील कार्यपद्धती, ऊस पुरवठा, आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.
निळकंठेश्वर पॅनलला निवडणुकीत मोठे यश
राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता. कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवले होते. त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला 21 पैकी 20 जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनेलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा मात्र सुपडा साफ झाला. त्यामुळे आता पुढील पाच वर्षांसाठी माळेगाव कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वरचष्मा असणार आहे, हे त्यावेळी सिद्ध झाले होते.
21 विजयी उमेदवारांची यादी
ब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
4) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
5) सौ संगीता कोक
6) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
7) शिवराज जाधवराव
8) राजेंद्र बुरुंगले
9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे
14) गणपत खलाटे
15) विजय तावरे
शिरवली गट
16) प्रताप आटोळे
17) सतिश फाळके
बारामती गट
18) नितीन सातव
19) देविदास गावडे
नीरावागज गट
20) जयपाल देवकाते
21) अविनाश देवकाते