महाज्योती, सारथी, बार्टी, आर्टी संस्थांमध्ये सुसुत्रता आणणार, अजित पवारांची विधान परिषदेत माहिती

३ हजार म्हणजे केवळ १ टक्का विद्यार्थ्यांनी पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. १ टक्का विद्यार्थ्यांसाठी २८० कोटी रुपयांचा निधी सरकारकडून वितरित करण्यात आला, हे अतिशय धक्कादायक असल्याचे पवार म्हणाले.

Ajit Pawar : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये संस्थांमध्ये सर्वसाधारण शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांची संख्या, प्रवेश प्रक्रिया आणि परदेशी शिष्यवृत्तीबाबत समान धोरण राबविण्यात येईल. तसेच इथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या निकषावर आणि आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली.

संस्थात पारदर्शकता आणणार…

दरम्यान, आगामी काळात बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थात सुसुत्रता आणणार असल्याचे पवार म्हणाले. विधान परिषदेचे अभिजीत वंजारी, सदस्य संजय खोडके यांनी सारथी संस्थेतील घरभाडे भत्ता आणि आकस्मितता निधी वितरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सारथी संस्थेमध्ये २०१८ ते २०२५ या दरम्यान, ८३ अभ्यासक्रमांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन, शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले.

शिष्यवृत्तीसाठी समिती गठीत…

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, शिष्यवृत्तींची संख्या ठरविणे, प्रवेश प्रक्रिया आणि गुणवत्ता वाढ याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता आला असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विधानपरिषदेत सांगितले. दरम्यान, गेल्या ५ वर्षात एका विद्यार्थ्यामागे जवळपास ३० लाख रुपये खर्च झाला. ही बाब खूप गंभीर आहे. यापुढील काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल. अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.


About Author

Astha Sutar

Other Latest News