Eknath Shinde – एकनाथ शिंदेंनी मूळ शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाकरे गटाला जी गळती लागली आहे, ती थांबायचं काही नाव घेत नाही. घरात बसणाऱ्याला नाही मात्र आता नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात, अशी उबाठाची अवस्था झाल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. अमरावती येथे आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्यात ते बोलत होते.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकांच्या दारात काम करत आहेत. लोक काम करणाऱ्याला निवडून देतात. त्यामुळं आम्ही काम केलं लोकांनी आम्हांला निवडून दिले.

धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव…
दरम्यान, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सत्ता येईल आणि जाईल पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी खुर्चीसाठी हपापलेलो नाही. आपल्याला खुर्चीचा मोह नाही, मात्र ज्या लोकांनी खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला आणि लोकांच्या मनातले सरकार आणले. सत्तेसाठी कुणासमोर तडजोड केली नाही. असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड पत्नी प्रीती संजय बंड यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
लाडक्या बहिणींनी विरोधकांना जोडा दाखवला…
राज्यात शासन आपल्या दारीसारख्या उपक्रमातून लोकांच्या दारी मंत्रालय नेले आणि त्यांचे प्रश्न सोडवले. महायुतीला विक्रमी मतदान करुन सत्ता दिली. त्यामुळे लाडकी योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. विरोधकांनी लाडकी बहिण योजनेला बदनाम केले. मात्र निवडणुकीत लाडक्या बहिणींनी विरोधकांना जोडा दाखवला. शिवसेनेची नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जातोय, असं शिंदे म्हणाले.