कर्नाक पूल कधी सुरू होणार? असा प्रश्न बऱ्याच काळापासून विचारला जात होता. दक्षिण मुंबईमधील मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाचे नामांतर करून आता त्याचे नाव ‘सिंदूर पूल’ असे ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असून यामुळे गेल्या 10 वर्षांपासून चालत असलेल्या पूर्व आणि पश्चिम मुंबईमधील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.
सिंदूर पूल म्हणून ओळखला जाणार!
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक कर्नाक पूल आता “सिंदूर पूल” म्हणून ओळखला जाणार आहे. मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, या पूलाचे नामकरण करण्यात आले असून, स्थानिकांची सांस्कृतिक आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. “सिंदूर” हे पारंपरिक आणि शुभ प्रतीक मानले जाते, त्यामुळे या नावाला विशेष महत्त्व आहे. कर्नाक पूल अनेक वर्षांपासून दक्षिण मुंबईतील वाहतूक आणि दळणवळणाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. नव्या नावामुळे या ऐतिहासिक पुलाला नवीन ओळख मिळेल. काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी काहींनी जुन्या नावाच्या ऐतिहासिक संदर्भाचे जतन करण्याची गरजही व्यक्त केली आहे.

वाहतूकीसाठी सिंदूर पूल फायदेशीर
150 वर्ष जुना असलेला हा कर्नाक पूल 2022 मध्ये पाडण्यात आला होता. त्यानंतर बीएमसीकडून मध्य रेल्वेच्या आराखड्यानुसार हा पूल परत नव्याने बांधण्यात आला. मात्र हा पूल तयार झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलनही केले होते. हा पूल वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे.