पुणे: राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. अशात आता हवामान विभागाने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. 6 आणि 7 आणि मे साठीचा हा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पुणे वेधशाळेने या बाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दोन दिवस यलो अलर्ट
हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच 6 मे ते 7 मो रोजी अंदाज वर्तवलेला आहे. यामध्ये हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मधल्या काळात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव या जिल्ह्यांत तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते असा अंदाज भारतीय हवामान विभागकडून वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली असून, जालना शहरासह जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे.वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीचा देखील तडाखा बसला आहे.